आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी नेत्‍यांचे सोलापूर दौरे | पुढारी

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी नेत्‍यांचे सोलापूर दौरे

सोलापूर, पुढारी वृत्‍तसेवा : राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पायउतार झाल्यानंतर सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची पहिलीच बैठक गुरुवारी (दि.२९) मुंबईतील राष्ट्रवादी भवन येथे पार पडली. या बैठकीस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी पालकमंत्री दत्तात्रेय भरणे, सोलापूरचे निरीक्षक शेखर माने, सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे उपस्थित होते.

महेश कोठे राष्ट्रवादीत कधी प्रवेश करणार? हा प्रश्‍न सोलापुरातील राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी उपस्थित केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. परंतु बैठक संपल्यानंतरही तोच प्रश्‍न कायम होता. माजी पालकमंत्री भरणे हे ७ ऑक्टोबरला सोलापूरच्या दौऱ्यावर येत आहेत, तर अजित पवार हे १५ ऑक्टोबरनंतर दिवाळीपूर्वी सोलापूरच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात सोलापूर शहरातील तीन विधानसभा मतदारसंघाचे तीन स्वतंत्र मेळावे, अल्पसंख्याक आणि अनुसूचित जाती-जमाती सेलचे मेळावे घेण्यात येणार आहेत.

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महिन्यातून एकदा सोलापूर जिल्ह्याचा दौरा करणार असल्याचे सांगितले. राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना माजी महापौर महेश कोठे हे राष्ट्रवादीच्या संपर्कात आले होते. सत्तांतर झाल्यानंतर राष्ट्रवादी सत्तेतून बाहेर गेली. मुख्यमंत्रीपदाची धुरा एकनाथ शिंदे यांच्याकडे आल्यानंतर कोठे व त्यांचे समर्थक मुख्यमंत्री शिंदे यांच्या संपर्कात असल्याने कोठे नक्की कोणत्या पक्षात आहेत, या बद्दल संभ्रम आहे.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कोठे यांची बाजू भक्कमपणे लावून धरली. तत्कालिन मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यामुळे त्यावेळी यशवंतराव चव्हाण सेंटरमधील प्रवेशाच्या कार्यक्रमात कोठे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाला मर्यादा आल्या होत्या. तांत्रिकदृष्ट्या कोठे यांचा प्रवेश झाला नसला तरीही ते राष्ट्रवादीसोबतच आहेत. आपल्या बैठकांना हजर राहतात, पक्षवाढीसाठी काम करतात, असे प्रदेशाध्यक्ष पाटील म्‍हणाले.

हेही वाचा

नांदेड-धानोरातील खंडोबा मंदिराच्या कळसावर पडली वीज, सुदैवाने जीवित हानी टळली 

सांगली : मुंबईच्या माजी नगरसेविका शितल म्हात्रे यांच्यावर कारवाई करा : महिला राष्ट्रवादीची मागणी

नाशिक : जिल्हा बँक ॲक्शन मोडवर; नांदगाव तालुक्यातील १५० थकबाकीदारांना अंतिम नोटीसा

Back to top button