नाशिक : जिल्हा बँक ॲक्शन मोडवर; नांदगाव तालुक्यातील १५० थकबाकीदारांना अंतिम नोटीसा | पुढारी

नाशिक : जिल्हा बँक ॲक्शन मोडवर; नांदगाव तालुक्यातील १५० थकबाकीदारांना अंतिम नोटीसा

नांदगाव : पुढारी वृत्तसेवा

नांदगाव तालुका नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ॲक्शन मोडवर आली असून तालुक्यातील टॉपच्या यादीतील १५० थकबाकीदारांवरती बँकेमार्फत कर्ज वसुलीबाबत अंतिम नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.

वेळीच कर्ज भरून सहकार्य न केल्यास या बड्या थकबाकीदारांचे नाव वृत्तपत्रात प्रसिद्ध करत थकबाकीदारांवरती कारवाईचा ईशारा देखील देण्यात आला आहे. नाशिक जिल्हा बँक मार्फत कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याने तालुक्यातील कर्ज थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहे. विविध कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून गावात पोहचलेली नाशिक जिल्हा सहकारी बँकेस लागलेल्या आर्थिकटंचाईचे ग्रहण संपता संपत नसून त्यात वारंवार प्रयत्न करुन देखील बँकेची थकबाकी वसूल होत नसल्याने अखेर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत कर्ज वसुलीसाठी कठोर पावले उचलली जात आहेत.

जिल्हास्तरावरील टॉपच्या यादीत शंभरवर असलेल्या थकबाकीदारांवर सुरु असलेली कारवाई आता नांदगाव तालुक्यातील टॉप १५० थकबाकीदारांवर होणार आहे. तालुक्यात एकूण ४५९८ थकबाकीदार आहेत. त्यांच्याकडे ४५ कोटी ३७ लाख ९६ हजार अधिक होणारे व्याज इतकी थकबाकी आहे. तर त्यापैकी तालुक्यातील १५०  थकबाकीदारांकडे ७ कोटी ६६ लाख ४६ हजार अधिक होणारे व्याज इतकी थकबाकी असून कर्ज वसुलीबाबत संबंधितांना जिल्हा बँक प्रशासनाच्या वतीने अंतिम नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. नांदगाव तालुक्यातील बड्या १५० थकबाकीदारांवर तातडीची वसुलीची कारवाई होणार असून, त्यापूर्वी गुरुवारी, दि.29 त्यांना अंतिम नोटीसा देऊन थकबाकी भरण्याविषयी कळविण्यात आले आहे. त्यातून होणारी कारवाई टाळावी, अन्यथा त्यांची नावे वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जातील, पुढील कारवाई बँक तसेच सहकार खाते संयुक्तरित्या करेल असे देखील  नोटीसीव्दारे सुचित करण्यात आले आहे.

१५० थकबाकीदारांना आम्हि कर्ज भरण्या संदर्भात अंतीम नोटीसा दिल्या आसुन,पुढिल होणारी कारवाई टाळायचे असेल तर आपली थकबाकी भरावी .अन्यथा पुढिल कारवाई बँक मार्फत करण्यात येईल. – मांगीलाल डंबाळे, विभागीय अधिकारी, जिल्हा बँक नांदगाव.

हेही वाचा:

Back to top button