सोलापूर : ‘दसरा मेळाव्याला परवानगी द्या, अन्यथा गनिमी काव्याने शिवाजी पार्कवर घुसू’ | पुढारी

सोलापूर : 'दसरा मेळाव्याला परवानगी द्या, अन्यथा गनिमी काव्याने शिवाजी पार्कवर घुसू'

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : दसरा मेळाव्याला परवानगी न मिळाल्याने शिवसेनेने न्यायालयात धाव घतली असतानाच सोलापूर जिल्ह्यातील शिवसैनिक अक्रमक झाले आहेत. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची परंपरा खंडित करण्याचा डाव राज्यशासनाने आखला आहे. हा डाव युवा सैनिक कोणत्याही परिस्थितीत उधळून लावतील. शिवाजी पार्कवर शिवसेनेच्या मेळाव्याला राज्यशासनाने परवानगी द्यावी. अन्यथा राज्यभरातून लाखो शिवसैनिक घेवून शिवाजी पार्कवर घुसू, असा इशारा युवा सेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांनी दिला आहे.

शासनाने शिवाजी पार्कवरील शिवसेनेच्या मेळाव्याला अद्याप परवानगी दिलेली नसली तरी शिवसेनेकडून मात्र मेळाव्याची जय्यत तयारी सुरू आहे. परवानगीसाठी शिवसेनेने न्यायालयात धाव घेतली असून उद्या सुनावणी आहे. दोन दिवसांपूर्वी शिवसेनेचे संपर्क प्रमुख अनिल कोकीळ यांनी तालुकानिहाय बैठक घेवून मेळाव्याची तयारी करण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्यातील शिवसैनिक तयारीला लागले आहेत. आज युवा सेनेच्या वतीने राज्यशासनाला दसरा मेळाव्याची तयारी गनिमी कावा पध्दतीने करु, असा इशारा दिला आहे.

युवा सेनेचे शरद कोळी म्हणाले की, शिवसेनेने कायदेशीरपणे परवानगी मागितली आहे. शासनाने या गोष्टीत राजकारण न करता शिवसेनेची परपंरा कायम ठेवण्यासाठी रितसर परवानगी द्यावी. जर शिवसेनेच्या मेळाव्याला जाणीवपूर्वक अडचण करण्याचा प्रयत्न केला तर राज्यभरातून लाखो युवा सैनिक घेवून शिवाजी पार्कवर घुसू. त्यानंतर होणार्‍या परिणामाला सर्वस्वी राज्यशासन जबाबदार राहील, असा इशारा कोळी यांनी दिला आहे.

हेही वाचा :

Back to top button