कुतुबमिनार 'आमचाच' असा दावा करणारी याचिका फेटाळली | पुढारी

कुतुबमिनार 'आमचाच' असा दावा करणारी याचिका फेटाळली

कुतुबमिनारच्या जागेवर हक्क सांगणारी याचिका फेटाळली

पुढारी ऑनलाईन-  गंगा आणि यमुना नदी पात्राच्‍या मध्यभागी येणारी मिरत ते गुरुग्राम अशा संपूर्ण जागेवर आणि कुतुबमिनारच्या जागेवर हक्क सांगणारी याचिका दिल्ली न्यायालयाने फेटाळली आहे. ही याचिका महेंद्र ध्वज प्रताप सिंग यांनी दाखल केली होती. त्यांनी या याचिकेत मिरत ते गुरुग्रामपर्यंतची संपूर्ण जागा आमच्या पूर्वजांची आहे, असा दावा केला होता. (Man claimed Qutub Minar built on his ancestral land)

आपण राजा नंदराम यांचे वंशज आहोत, राजा नंदराम यांचे निधन १६९५ मध्‍ये झाले. गंगा आणि युमना या दोन नद्यांच्या पात्राच्या मध्यभागी येणारा मिरत, आग्रा, बुलंदशहर, अलिगढ, गुरुग्राम यांची वंशपरंपरागत मालकी आमच्याकडे आहे. एकत्रित आग्रा प्रांतात येणारी संपूर्ण जागा आमची आहे, असा दावा त्यांनी केला होता. अतिरिक्त सत्र न्यायाधीश दिनेश कुमार यांनी ही याचिका फेटाळून लावली.

ही याचिका फेटाळण्यात आल्याने कुतुबमिनार संदर्भातील इतर याचिकांवर सुनावणीचा मार्ग मोकळा झाला आहे. कुतुबमिनार संदर्भातील अन्‍य  याचिकांवरील सुनावणी आता १९ ऑक्टोबरपासून हाेणार आहे. हिंदू आणि जैन धर्मियांतील काही नागरिकांनी
कुतुबमिनार परिसरातील कुव्वत उल इस्लाम या मशिदीत पूजा विधीचा हक्क मागणारी याचिका दाखल केली आहे. जैन तीर्थंकर ऋषभदेव आणि हिंदू देवता विष्णू यांच्यावतीने ॲड. हरीशंकर आणि रंजना अग्निहोत्री यांनी ही याचिका दाखल केली आहे. कुतबमिनारची उभारणी करताना २७ मंदिरं पाडण्यात आली होती, असा दावा या याचिकेत करण्यात आला आहे.

हेही वाचा

Back to top button