पुढारी ऑनलॉइन डेस्क : 'रघुपती राघव भजना'वरून आक्षेप घेतल्याबद्दल जम्मू काश्मीरच्या पीडीपीच्या अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती यांच्यावर भाजपने हल्ला चढवण्यात आला आहे. तर नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारूख अब्दुल्ला यांनी एएनआयशी बोलताना प्रतिप्रश्न केला आहे. फारूख म्हणाले अजमेर दर्ग्याला भेट दिल्याने एखादा हिंदू लगेच मूसलमान होतो का? एवढे बोलून त्यांनी आणखी काही बोलण्यास टाळले.
पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी काश्मीरमधील शाळांमध्ये भजन-गाण्याला विरोध केल्यानंतर नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांनी याविषयी मत मांडले आहे. पीडीपीच्या अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती यांनी शाळांमध्ये भजन गाण्याच्या आदेशावरून जम्मू-काश्मीरमधील भाजप सरकारची निंदा केल्यानंतर, नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारूख अब्दुल्ला यांनी या बाबत मतभेद व्यक्त केले आहेत.
"आमचा द्विराष्ट्र सिद्धांतावर विश्वास नव्हता. भारत जातीयवादी नाही आणि भारत धर्मनिरपेक्ष आहे. मी भजन म्हणतो. जर मी भजन म्हणत असेल तर ते चुकीचे आहे का?" फारुख अब्दुल्ला यांनी एएनआय या वृत्तसंस्थेच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.
"जर एखादा हिंदू अजमेर दर्ग्याला भेट देतो, तर त्याचे मुसलमानात रूपांतर होईल का?" असा प्रश्न फारूख यांनी विचारला. त्यानंतर आणखी पुढे बोलणे टाळले.
मेहबूबा यांनी भाजपच्या 'हिंदुत्व' अजेंड्यावर टीका केली. सोमवारी (19 सप्टेंबर), मेहबूबा मुफ्ती यांनी एक व्हिडिओ ट्विट केला. ज्यामध्ये काश्मीरमधील एका शाळेतील कर्मचारी वर्गात महात्मा गांधींचे आवडते भजन मानले जाणारे प्रसिद्ध भजन 'रघुपती राघव राजा राम' हे विद्यार्थ्यांना शिकवत आहेत.
"धार्मिक विद्वानांना तुरुंगात टाकणे, जामा मशिद बंद करणे आणि येथील शाळकरी मुलांना हिंदू भजन गाण्यासाठी निर्देशित करणे काश्मीरमध्ये भारत सरकारचा खरा हिंदुत्व अजेंडा उघड करतो," असे मेहबुबा यांनी व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.
मेहबुबा यांच्या या आक्षेपावर इंडिया टुडेने याबाबत म्हटले आहे, सरकारी आदेशाची वस्तुस्थिती तपासणी आणि कागदपत्रांनुसार, 'रघुपती राघव…' चे पठण हे राष्ट्रपिता यांच्या १५३व्या जयंतीनिमित्त होणाऱ्या उपक्रमांच्या मालिकेचा एक भाग आहे. 'रघुपती राघव…' हे गांधीजींच्या आवडत्या भजनांपैकी एक असल्याने, म्हणूनच हे भजन उत्सवाचा एक भाग होते.
भाजपने मेहबूबा यांच्यावर जोरदार हल्ला चढवला
जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या आरोपांवर सत्ताधारी भाजपकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. जम्मू आणि काश्मीर युनिटचे अध्यक्ष रविंदर रैना यांनी मुफ्ती यांच्यावर निहित राजकीय स्वार्थासाठी "तरुणांच्या मनावर विष टाकण्याचा" आरोप केला.
"मेहबूबा यांनी अशा प्रकारचे राजकारण करणे टाळले पाहिजे. काश्मीरमध्ये तिने आपले स्थान गमावले आहे आणि खोऱ्यातील लोकांनी तिला नाकारले आहे. ती तिची जागा परत मिळवण्यासाठी, असे षड्यंत्र रचून बाहेर येत आहे," असे रैना म्हणाले.
मुफ्ती यांनी केंद्रशासित प्रदेशात दस्तर बंदीच्या समारंभांवर बंदी आणण्यास विरोध केला होता आणि भाजप सरकारवर आरोप केला होता की "आपला फूट पाडणारा अजेंडा लागू करण्यासाठी" काश्मीरमधील सर्व धार्मिक आणि सुफी परंपरा नष्ट केल्या जात आहेत.