सोलापूर : दुचाकी, चारचाकी वाहने चोरणारी टोळी जेरबंद | पुढारी

सोलापूर : दुचाकी, चारचाकी वाहने चोरणारी टोळी जेरबंद

मोहोळ : पुढारी वृत्तसेवा : दुचाकी व चारचाकी वाहनांसह इंधन चोरी करुन विक्री करणाऱ्या टोळीचा मोहोळ पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून तीन ट्रॅक्टर, दोन पिकअप व एका बुलेटसह तब्बल २५ लाख ४५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. सोलापूर, उस्मानाबाद, लातूर व पुणे जिल्ह्यात केलेल्या चोरीच्या गुन्ह्यांची उकल केल्याची माहिती मोहोळचे पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांनी आज (दि.१८) माध्यमांशी बोलताना दिली.

याबाबत पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांनी सांगितले की, मोहोळ पोलिसांचे गुन्हे शाखेचे पथक १४ जूनरोजी सावळेश्वर परिसरातील रात्रगस्त घालत होते. यावेळी तीन इसम हातात केंड घेऊन डिझेल चोरी करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. यावेळी पोलीस पथकाला पाहून तिघेही चोरटे बुलेट मोटरसायकलवरून पळून जाऊ लागले. यावेळी पोलीस पथकाने पाठलाग करून तिघांनाही ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्यांची नावे सतीश शहाजी खांडेकर (रा. वडणेर ता. परंडा), विशाल संभाजी मेरड, विशाल लक्ष्मण खळवट (दोघे रा. उंडेगाव ता. बार्शी) असल्याचे समजले.

पोलिसांनी त्यांना अटक करून त्यांच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता या टोळीने मोहोळ, शेटफळ, सावळेश्वर या ठिकाणी डिझेल चोरी केल्याची कबुली दिली. तसेच करमाळा, माढा, भूम येथून ट्रॅक्टरची, पुणे येथून बुलेटची तर मुरुड (जि. लातूर) येथून महिंद्रा पिकपची चोरी केल्याचे पोलीस तपासात उघड झाले. पोलिसांनी त्यांच्याकडून तीन ट्रॅक्टर, दोन पिकअप व एका बुलेट मोटरसायकलसह एकूण २५ लाख ४५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला.

सध्या तीनही आरोपी मोहोळ पोलिसांच्या ताब्यात असून त्यांच्याकडून अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे. या टोळीत या तिघांचे अन्य साथीदार देखील असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात आली आहे. मोहोळ गुन्हे प्रकटीकरण शाखेचे (डी.बी) पथकातील पोलीस नाईक अमोल घोळवे, हेड कॉन्स्टेबल सचिन माने, प्रवीण साठे, सिद्धनाथ मोरे यांच्या पथकाने केलेल्या धडाकेबाज कामगिरीमुळे वाहन मालकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी मोहोळचे पोलीस निरीक्षक अशोक सायकर व त्यांच्या टीमचे विशेष कौतुक केले आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button