Solapur : आवाज करू नको, नाहीतर गोळ्या घालीन | पुढारी

Solapur : आवाज करू नको, नाहीतर गोळ्या घालीन

मोहोळ; पुढारी वृत्तसेवा : एका हॉटेल व्यवसायिकाला चार अज्ञातांनी बंदुकीचा धाक दाखवून लुटमार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या लुटारूंनी चारचाकी गाडी रस्त्यात अडवून लोखंडी पाईपने मारहाण करून अडीच लाख रुपये लंपास केले. स्कॉर्पिओ व स्विफ्ट कार मधून आलेल्या या चार अज्ञातांनी बंदुकीचा धाक दाखवून या व्यावसायिकास लुटले. (Solapur)

ही घटना ३१ मे रोजी पहाटे तीन वाजता मोहोळ तालुक्यातील शेटफळ येथील विश्रामगृहासमोर घडली. सुरेश उर्फ बबलु प्रकाश गुंड (रा. खंडाळी ता. मोहोळ) असे लूट झालेल्या व्यवसायिकाचे नाव आहे. या घटनेची नोंद मोहोळ पोलिसात करण्यात आली आहे.

याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, मोहोळ तालुक्यातील खंडाळी येथील सुरेश उर्फ बबलु प्रकाश गुंड हे हॉटेल व्यवसाय करतात. ३० मे रोजी ते त्यांचा मित्र चित्तारा उर्फ लाला बाळू मुळे याच्यासह अशोक लेलंड बडा दोस्त (एम.एच. ४५ ए.ई. ५३४८) या गाडीने निखिल मार्केटिंग पुणे यांच्याकडे नाना निवृत्ती चव्हाण यांचे किराणा मालाचे पैसे आणण्याकरीता गेले होते.

रात्री पावणे अकरा वाजता हे दोघेजण पैसे घेऊन पुण्याहून खंडाळीकडे निघाले होते. मध्यरात्री अडीच वाजता सुरेश गुंड यांनी चित्तारा उर्फ लाला मुळे यांना मोडनिंब मध्ये सोडून खंडाळीकडे निघाले होते. पहाटे तीन वाजता त्यांची चार चाकी शेटफळ येथील विश्रामगृहात समोर आली असता, पाठीमागून पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ व ग्रे रंगाची स्विफ्ट कार त्यांच्या कार समोर येऊन उभी राहिली. त्या दोन्ही गाड्यातून लाल रंगाचा शर्ट व निळ्या रंगाची जिन्स, निळया रंगाचा फुल भायाचा ट्रॅक सुट, काळ्या रंगाची पॅन्ट शर्ट आणि टीशर्ट व जिन्स पॅन्ट घातलेले चार अज्ञात लोक खाली उतरले. त्यातील एकाने सुरेश गुंड यांच्या गाडीच्या काचेवर अंडी फेकून मारले. यावेळी एक जणांनी त्यांच्या गाडीचा दरवाजा उघडून त्यांना खाली उतरवून लोखंडी पाईपने मारहाण केली.

यावेळी लाल रंगाचा शर्ट घातलेल्या इसमाने गुंड यांच्या डोक्याला बंदूक लावून “अवाज करू नको, नाहीतर तूला गोळ्या घालीन” अशी धमकी दिली. त्यानंतर त्यांनी सुरेश गुंड यांच्या गाडीत पांढऱ्या रंगाच्या पिशवीत ठेवलेले अडीच हजार रुपये काढून घेतले व गुंड यांची गाडी लॉक करून चावी घेऊन पसार झाले. सर्व लुटारूंनी पायामध्ये बुट व तोंडावरती मास्क लावलेले होते. तसेच त्यांच्या दोन्ही गाडयांवरती नंबर प्लेट देखील नव्हती.

या प्रकरणी सुरेश गुंड यांनी मोहोळ पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार चार अज्ञात लुटारूंच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे आश्चर्य व्यक्त केले जात असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मोहोळचे पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक धनाजी खापरे हे करीत आहेत. या घटनेमुळे गुन्ह्याचा छडा लावण्याची मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.

हेही वाचा

Back to top button