शिवसेनेने संभाजीराजेंवर अन्याय केला : रामदास आठवले | पुढारी

शिवसेनेने संभाजीराजेंवर अन्याय केला : रामदास आठवले

इंदापूर, पुढारी वृत्तसेवा : भाजपाचे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यावर शिवसेनेने अन्याय केलेला आहे. संभाजीराजे यांनी अपक्ष लढण्याची भूमिका जाहीर केली होती. त्यांनी जर भाजपकडे प्रयत्न केला असता तर ते भाजपचे उमेदवार राहिले असते. मात्र ते स्व:ताच स्वबळावर लढण्याचे सांगत होते. त्यांना दिलेला शब्द शिवसेनेने पाळला नाही.

महाविकासआघाडी नेत्यांना त्यांना धोका दिलेला आहे. त्यामुळे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर आरोप करू नयेत. भाजपचा याच्याशी काहीही संबंध नसल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी स्पष्ट केले आहे.

आठवले म्हणाले, यापूर्वी काँग्रेसचे नाना पटोले म्हणाले होते राष्ट्रवादीने आमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. त्यांचे तसे मत असेल तर त्यांनी महाविकास आघाडीत न राहता हिम्मत असेल तर पाठिंबा काढून घ्यावा. काँग्रेसने पाठिंबा काढला की भाजप आणि आम्ही सरकार करायला तयार आहोत. आमच्याकडे १०५ आमदार असून अपक्षांचा देखील आम्हाला पाठिंबा आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदासाठी खंबीर आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेपेक्षा फडणवीस हे कोणताही निर्णय घेण्यासाठी सक्षम आहेत. त्यांचे काम देखील ठाकरेपेक्षा उत्तम होते. त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासासाठी फडणवीस मुख्यमंत्री होणे आवश्यक आहे.

मागील आठ वर्षे सबका साथ सबका विकास करण्यासाठी काम भाजप करत आहोत. शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना सरकारने दिलेल्या आहेत. 2024 च्या निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदींच्या सामना करण्याची ताकद कोणत्याही पक्षांमध्ये नाही. 2024 मध्ये पुन्हा आम्ही सत्तेत आल्याशिवाय राहणार नाही, त्या दिशेने आमची वाटचाल सुरू आहे.

राज्यसभेच्या निवडणुकीत भाजप हे घोडेबाजार करेल, असा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला हाेता.  यावर आठवले म्हणाले की ,घोडेबाजाराचा विषय नसून घोडेबाजार आम्ही करणारच नाही. आमचा बाजार आहे तो माणसांचा. जास्त मते आमच्याकडे आहेत ती मते आम्हालाच मिळतील.

लोकसंख्या नियंत्रणासाठी समान नागरी कायदा

समान नागरी कायदा झाल्यास मागासवर्गीयवर अन्याय होईल का यावर मागासवर्गीयांच्या जीवनावर त्याचा परिणाम होणार नसून मुस्लिम समाजामध्ये समान नागरी कायदा बद्दल गैरसमज आहेत. समाजाने गंभीरपणे घेऊ नये. एखाद-दुसर्‍या कुटुंबात सर्वाधिक मुले असतील सर्वांच्यात तसा प्रश्न नाही. समान नागरी कायदा आला तर लोकसंख्या नियंत्रणासाठी त्याचा चांगला उपयोग होऊ शकेल. तसा कायदा आला पाहिजे असे ते म्‍हणाले.

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरपीआय सर्व जागा लढवणार

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत भाजपासोबत सन्माजनक जगा घेऊन आरपीआय सर्व जागा निवडून आणणार असून त्यापद्धतीने भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा झाली आहे. प्रामुख्याने मुंबई महापालिका जिंकायची आहे. शिवसेनेच्या कामकाजाबाबत नाराजी असून झोपडपट्टीतील नागरिक आरपीआय सोबत आहेत. महाविकास आघाडीला आम्ही या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पराभूत केल्याशिवाय राहणार नाही.

पोलिसांचे महाविकास आघाडीतील मंत्र्यांच्या दबावाखाली काम

भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांना निमंत्रण असेल तर त्या ठिकाणी त्यांना चौंडीत अडवणे चुकीचे आहे. पोलिस महाविकास आघाडीतील मंत्र्यांच्या दबावाखाली काम करतात. असा पोलिसांवर त्‍यांनी आरोप केला.

ओबीसी आरक्षणाला पाठिंबा

महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षणासाठी महाविकास आघाडीने टाळाटाळ केली असल्याचा आरोप होत आहे. भाजपची याबद्दल काय भूमिका आहे यावर आमचा ओबीसी आरक्षणाला पाठिंबा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर त्यांना ते आरक्षण टिकवता आले नाही. न्यायालयात त्यांना त्यांची बाजू मांडता आली नाही. त्यामुळे गेलेला ओबीसी व मराठा समाजाच्या गेलेल्या आरक्षणाला महाराष्ट्रातील हे सरकार जबाबदार आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे अशी आमच्या पक्षाची देखील मागणी आहे. जो गरीब मराठा ज्यांचे उत्पन्न आठ लाखाच्या आत आहे, यांना सुरुवातीलाच ओबीसी वर्गात घ्यायला हवे होते तसे झाले नाही. त्यासाठी ओबीसी समाजाची लोकसंख्या किती आहे, हे समजण्यासाठी जातिनिहाय जनगणना करण्याची आमची मागणी आहे. त्यामध्ये सर्वांचीच लोकसंख्या कळणार आहे.

हेही वाचा  

Back to top button