छत्रपती राजाराम महाराज : मराठा पुरोहितांकडून राज्याभिषेक करुन घेणारा राजा

छत्रपती राजाराम महाराज
छत्रपती राजाराम महाराज

एक असा राजा ज्याने आपला राज्याभिषेक मराठा पुरोहितांकडून करुन घेतला होता. त्या राज्याभिषेकाला आज 100 वर्षे पूर्ण होत आहेत त्या निमित्तानं…

राजर्षी शाहू छत्रपतींचे ६ मे १९२२ रोजी निधन झाले आणि आखिल ब्रह्मसमंध मराठा बहुजनांच्या मनात आणि व्यवहारात राजर्षींनी घडवून आणलेली परिवर्तनाची चाके उलटी फिरवण्याचे मनसूबे रचू लागला. राजर्षींचा अंतविधी तर त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई राणीसाहेब यांनी राजर्षींच्या इच्छेनुसार मराठा पुरोहितांकडून करून घेतला होता. पण थोडी धार्मिक वृत्ती असणाऱ्या राजाराम महाराजांना फितवून, भीती घालून त्यांचा राज्याभिषेक मात्र पुन्हा ब्राह्मण राजोपाघ्यांकडून करुन घ्यायचे मनसूबे रचले जाऊ लागले. यासाठी भीती हे सनातनी हत्यार वापरण्याचा जोरदार प्रयत्न कोल्हापूर आणि बाहेरच्या तथाकथित भूदेवांकडून सुरू झाला. राज्याभिषेकासारखा महत्त्वाचा विधी करण्याचा अधिकार फक्त ब्राह्मण पुरोहितांनाच आहे असा आग्रह धरला गेला. असे झाले नाही तर अनर्थ, आघटीत होण्याची भीती घातली जाऊ लागली. पण राजर्षींच्या रक्ताचा आणि विचारांचा छावा असणाऱ्या राजाराम महाराजांनी या सनातनी वृत्तीला पायबंध घालून ३१ मे १९२२ रोजी रितीप्रमाणे विधीपूर्ण राज्यकारभाराची सूत्रे आपल्या हाती घेतली.

राजर्षी शाहू छत्रपतींनी बहुजनांना धार्मिक गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी मराठा पुरोहित निर्माण करणारे श्री शिवाजी क्षत्रिय वैदिक विद्यालय स्थापन केले होते. या विद्यालयाचे विद्यार्थी यावेळी राज्याभिषेकासारखा महत्त्वपूर्ण विधी करण्याइतके सक्षम झाले होते. असा मोठा व महत्त्वपूर्ण विधी पार पाडण्यासाठी मुख्य पुरोहित आवश्यक असतो. जो पुरोहितांकडून विधी करवून घेतो. यावेळीपासून ही जबाबदारी राजर्षी शाहू छत्रपतींनी स्थापन केलेल्या क्षात्रपीठाचे पीठाधीपती श्री क्षात्रजगदगुरू यांनी पार पाडली. मोठ्या समारंभाने विधीपूर्वक व वैदिक पध्दतीने मराठा पुरोहितांकडून हा महत्त्वपूर्ण विधी क्षात्रजगद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.

एका ब्राह्मणेत्तर मराठा पुरोहितांकडून वैदिक विधीने संपन्न झालेला हा राज्याभिषेक समारंभ हा आखिल हिंदुस्थानातील अशा प्रकारचा पहिलाच समारंभ होता. आपल्या संस्थानातील आणि संस्थानाबाहेरील काही लोकांचा विरोध पत्करून आईसाहेब महाराज आणि राजाराम महाराजांनी हा अभूतपूर्व सोहळा घडवून आणला. यातून त्यांचा कणखरपणा, दृढनिश्चय, पतीने व वडिलांनी केलेल्या अलौकिक कार्याची जाणीव व ते कार्य पुढे नेण्याची जबाबदारी , कर्तव्याचे भान या सर्व गोष्टींचे एकत्रित दर्शन होते.

राजाराम महाराजांनी अगदी सुरूवातीलाच दाखविलेल्या या कणखरपणाचे तत्कालीन समाज सुधारकांनी, सत्यशोधकांनी, विचारवंतांनी स्वागत करून मोठे कौतुकही केले होते. विजयी मराठाकार श्रीपतराव शिंदे या सोहळ्याविषयी लिहतात की , " ता . ३१ मे हा दिवस धार्मिक मन्वंतराच्या दृष्टीने इतका महत्त्वाचा आहे की, तो हिंदू धर्माच्या इतिहासांत सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा लागेल. कोल्हापूरसारख्या सर्व ब्राह्मणेतरांच्या आदरास पात्र झालेल्या संस्थानाधिपतींचा राज्यारोहण समारंभ मराठा पुरोहितांकडून होत आहे ही गोष्ट धार्मिक बाबतीत अगदीच नवी असून तिचा परिणाम हिंदुस्थानातील सर्व राजेरजवाडयांवर, ब्राह्मणेतर लक्ष्मीपतींवर व सामान्य हिंदू जनतेवर झाल्याशिवाय खास राहणार नाही. लाखो लोक या गोष्टींचे अनुकरण करून भटांवर पूर्ण बहिष्कार घालतील, धर्मविधीकरिता हिंदू संस्थानिकांच्या व श्रीमंतांच्या खजिन्यांतून ब्राह्मणांच्या पदरात पडणारे लाखो रूपये यापुढे या संस्थानिकांच्या व श्रीमंतांच्या जातीतील अनाथ विद्यार्थ्यांना आणि दीनदुबळ्यांना मदत करण्याच्या पवित्र कार्यात खर्च होतील आणि या सर्वांमुळे ब्राह्मणेतरांच्या ठिकाणी ब्राह्मणांविषयी बसणारा धार्मिक आदर नामशेष होईल. सारांश धार्मिक मन्वंतर होण्याला ज्या म्हणून गोष्टी अवश्य लागतात, त्या सर्व या राज्यरोहण समारंभाने उत्पन्न केल्या आहेत. म्हणूनच ता . ३१ मे या दिवशी धार्मिक मन्वंतरास प्रत्यक्ष रितीने सुरूवात झाली असे आम्ही मानतो."

अशा तऱ्हेने ब्राह्मणी धार्मिक सत्तेला लत्ताप्रहार देणाऱ्या श्री राजाराम छत्रपतींना माझा मानाचा मुजरा….

ता.क. : – अशा या शाहूपुत्र राजाराम महाराजांचे आम्ही तयार केलेले चिञमय चरित्र लवकर प्रकाशित होईल.

– डॉ. देविकाराणी पाटील, कोल्हापूर

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news