सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे 'एप्रिल फुल' आंदोलन; महागाईचा निषेध | पुढारी

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे 'एप्रिल फुल' आंदोलन; महागाईचा निषेध

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा: महागाईने सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. अनेकांना प्रपंच चालविणे मुश्किल बनले आहे. जीवनावश्यक वस्तूंचे दर गगणाला भिडत आहेत. डिझेल शंभरीच्या उंबरठ्यावर तर पेट्रोलने शंभरी पार केली आहे. एकूणच जनता जगण्या-मरण्याचा संघर्ष करत असताना महागाई कमी करण्यासाठी केंद्रातील सरकार कोणतेही ठोस पाऊल उचलताना दिसत नाही. महागाई आणि बेरोजगारी कमी करण्याचे आश्वासन देऊन कमळाच्या साक्षीने सत्तेवर आलेल्या सरकारचा सोलापूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने प्रतिकात्मक स्वरुपात जनतेला कमळाची फुले वाटप करून ‘एप्रिल फुल’ करत आंदोलन करण्यात आले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र असलेला निषेधाचा केक कापून आदोलनात निषेध नोंदविण्यात आला.

राष्ट्रवादी युवकचे सोलापूर शहराध्यक्ष जुबेर बागवान यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी सकाळी अक्कलकोट रोडवरील पेट्रोल पंपावर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या वाहधारकांना कमळाचे प्रतिकात्मक फुल देऊन जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

देशभरातील नागरिक अगोदरच कोरोनाच्या संकटात होरपळून गेले आहेत. तब्बल दोन वर्षे सामान्य जनतेने महागाईचे चटके सहन केले आहेत. आता कुठे कोरोना हद्दपार होऊन सर्वकाही सुरळीत होईल असे वाटत असतानाच पुन्हा महागाईने डोकेवर काढले आहे. जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडल्यामुळे जनतेला सर्वाधिक फटका बसत आहे. गलेलठ्ठ पगार असणारा महागाईत होरपळून गेला असतानाच सामान्य नागरिकांच्या जगण्याचा विचारच न केलेला बरा.

महागाईमुळे महिलांचे किचन बजेट कोलमडून पडले आहे. देशातील नागरिकांची महागाईमुळे झोप उडालेली असताना केंद्रातील सरकार मात्र, महागाई कमी करण्यासाठी हतबल ठरले आहे. इंधन दरवाढ नकोशी झाली आहे. वाहन घेऊन घराबाहेर पडणे नागरिकांना मुश्किल बनले आहे. बाजारात गेल्यावर १०० रुपयांची नोट मोडून एक दिवसाचेसुद्धा किराणा घरी आणता येत नाही अशी परिस्थिती होऊन बसली आहे. देशातील सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरल्याचा आरोप करत नागरिकांना कमळ फुल देऊन एप्रिल फुल करत महागाईचा निषेध या आदोलनात करण्यात आला.

यावेळी प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर, अहमद मासुलदार, आशिष बसवंती, मुसा अत्तार, प्रशांत फाळके, विक्रांत खुणे, महेश पवार, कृणाल वाघमारे, हुसेन शहानुरकर, मुझफ्फर बागवान, सर्फराज बागवान, सादिक कुरेशी, विश्वनाथ बिडवे, मोहसीन मुजावर, शुभम शितोळे, रियाज अत्तार, इरफान शेख, विवेक फुटाणे, इरफान शेख, अबादिराजे बागवान, फारुख शेख, इमाम सय्यद, लखन चव्हाण, सनी पवार, सोहेल पटेल, रमीज मुल्ला, सादिक शेख, अमोल उपाडे, गौस मोहोळकर आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कमल का फुल नव्हे एप्रिल फुल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महागाई कमी करू, बेरोजगारांना रोजगार देऊ, युवकांना नोकऱ्या देऊ, देशातील प्रत्येक नागरिकाच्या बँक खात्यावर १५ लाख रुपये देवू अशी खोटी आश्वासने देऊन सामान्य जनता व युवकांची फसवणूक केली आहे. आज देश महागाईत होरपळून जात आहे. मात्र, या सरकारला याचे कसलेच भान राहिलेले दिसत नाही. शेतकऱ्यांच्या जीववर उठलेले केंद्रातील हे सरकार खऱ्या अर्थाने एप्रिल फुल करण्याच्या लायकीचेच सरकार आहे. ‘कमल का फुल नव्हे तर एप्रिल फुल’ अशीच या सरकारला उपमा द्यावी लागणार आहे.

महागाईचा आगडोंब सुरू असताना भाजप सरकारमधील नेते मूग गिळून गप्प आहेत, हे देशासाठी लाजिरवाणे आहे. कृषिप्रधान देशात शेतकरी आत्महत्येनंतर आता महागाईमुळे प्रपंच चालविणे मुश्किल बनल्यामुळे होणाऱ्या नागरिकांच्या आत्महत्यांची सरकार वाट पाहत आहे काय? देशाचे वाटोळे करणाऱ्या सरकारने महागाई कमी करण्यासाठी तातडीने ठोस पाऊल उचलावे अन्यथा महागाईविरोधात जनतेला सोबत घेवून उग्र आंदोलन छेडू अशा इशारा ही यावेळी देण्यात आला.

हेही वाचलंत का? 

Back to top button