‘जयप्रभा’ खरेदीदारांच्या कार्यालयावर शाईफेक | पुढारी

‘जयप्रभा’ खरेदीदारांच्या कार्यालयावर शाईफेक

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : जयप्रभा स्टुडिओची खरेदी करणारे रौनक शहा आणि पोपट शहा यांच्या भवानी मंडप येथील कार्यालयावर संतप्त आंदोलकांनी रविवारी शाईफेक केली.

कोल्हापूरची अस्मिता असलेला हा स्टुडिओ 15 दिवसांत शासनास परत करण्याची मागणी करत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला. सचिन तोडकर, दिलीप पाटील, रुपेश पाटील, निलेश सुतार यात सहभागी झाले होते. भवानी मंडप येथील शहा यांच्या कार्यालयासमोर कार्यकर्ते जमले. त्यांनी कार्यालयावर शाईफेक करून निषेध नोंदविला.

या प्रकरणी स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन दिलीप तोडकर (रा. आझाद चौक) यांच्यासह चौघांविरुद्ध जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तोडकरसह दिलीप मधुकर पाटील (मुक्त सैनिक वसाहत), सुभाष पाटील (हनुमान गल्ली, शिरगाव, करवीर), प्रकाश सुतार (जुनी मोरे कॉलनी, कोल्हापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलिस कॉन्स्टेबल सुनील आमते यांनी फिर्याद दाखल केली.

‘जयप्रभा’साठी साखळी उपोषण सुरू

जयप्रभा स्टुडिओच्या विक्रीप्रकरणी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने आक्रमक भूमिका घेतली आहे. हा स्टुडिओ चित्रीकरणासाठीच राहिला पाहिजे, या मागणीसाठी कलाकार, तंत्रज्ञांसह सामान्य नागरिकांच्या पाठिंब्यातून मराठी चित्रपट महामंडळाने रविवारी साखळी उपोषण सुरू केले.

जोपर्यंत स्टुडिओत चित्रीकरणाला सुरुवात होत नाही, तोपर्यंत साखळी उपोषण सुरूच राहील, असा निर्धार कलाकार, तंत्रज्ञ व नागरिकांनी व्यक्त केला. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करून स्टुडिओचा परिसर दणाणून सोडला. काहीही करून जयप्रभा स्टुडिओ वाचलाच पाहिजे, महापालिकेने जागा ताब्यात घ्यावी, अशा विविध घोषणा यावेळी देण्यात आल्या.

गानसम-ाज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनानंतर या ठिकाणी त्यांचे स्मारक करण्याचा प्रस्ताव पुढे आला. दरम्यान, मंगेशकर यांच्या हयातीतच दोन वर्षांपूर्वी या स्टुडिओची विक्री झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जयप्रभा स्टुडिओची जागा चित्रीकरणासाठी असावी, त्याठिकाणी चित्रीकरण सुरू करावे, स्टुडिओमधील इमारतींसह खुली जागा आरक्षित राहावी, व्यावसायिक कारणासाठी या जागेचा वापर होऊ नये, स्टुडिओत लता मंगेशकर यांचे स्मारक साकारावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. या मागणीसाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, कलाकार व तंत्रज्ञांनी हे आंदोलन सुरू केले आहे.

आंदोलनात महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर, सहखजिनदार शरद चव्हाण, संचालक रणजित जाधव, सतीश बीडकर, रवी गावडे, माजी उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर, इम्तियाज बारगीर, अ‍ॅड. बाबा इंदुलकर, माजी नगरसेविका सुरेखा शहा, स्वप्निल राजशेखर, आर. के. पोवार, बाबा पार्टे, भूपाल शेटे, सचिन तोडकर, निर्माते विजय शिंदे, अर्जुन नलवडे, अमर मोरे, नृत्य दिग्दर्शक संग्राम भालकर, रोहन स्वामी, राहुल राजशेखर, अवधूत जोशी, रवींद्र बोरगावकर, राजू पसारे आदी सहभागी झाले होते.

Back to top button