सोलापूर : कारखाना नकोच...आपलं गुर्‍हाळच बरं! - पुढारी

सोलापूर : कारखाना नकोच...आपलं गुर्‍हाळच बरं!

सोलापूर;  पुढारी वृत्तसेवा

उसाच्या फडाशेजारी पूर्वी गुर्‍हाळाच्या चुली पेटायच्या. त्यातून गुळाच्या ढेपा बाहेर पडायच्या. कालांतराने साखर कारखान्यांचे पेव फुटले. त्यातून बक्‍कळ पैसा खुळखुळू लागला. यामुळे शेतकरीही सुखावले. मात्र, आता ऊस उत्पादकांना एमआरपी व इतर बाबींमुळे कारखाना नको वाटत असून, त्यापेक्षा गुर्‍हाळाकडे त्यांचा ओढा वाढला आहे. साखर पट्ट्याबरोबरच दुष्काळी तालुक्यातही गुर्‍हाळावर मोठ्या प्रमाणात भर देण्यात येत आहे.

सोलापूर जिल्ह्यात 33 साखर कारखाने आहेत. त्यातील काही कारखान्यांनी परवानगी न घेताच गाळपाला सुरुवात केली आहे. सुरु असलेल्या कारखान्यांनी आतापर्यंत 66 लाख 98 हजार 884 मेट्रिक टन उसाचे गाळ केले आहे. बहुतांश कारखान्यांनी गाळप केलेल्या उसाचे एफआरपीप्रमाणे हप्‍तेही दिले नाहीत. याशिवाय बहुतांश कारखान्यांनी गतवर्षांचे हप्‍तेही दिले नाहीत. यामुळे शेतकर्‍यांकडून कारखान्यांच्या या कारभाराबाबत नाराजी व्यक्‍त करण्यात येत आहे.

आता आपला ऊस कारखान्याला न देता ते गुर्‍हाळ करुन गुळाचे उत्पादन घेण्यावर भर देत आहेत. यात रासायनिक प्रक्रियेला फाटा देत चक्क सेंद्रिय गूळ निर्मितीवर भर दिला जात आहे. याशिवाय काकवीला मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने त्यातूनही शेतकरी मोठ्या प्रमाणात उत्पादन घेत आहेत. शिवाय मार्केटमध्ये गुळाला चांगला दरही आहे. यातून तत्काळ पैसे मिळत आहेत. गुळाचे आडत व्यापारी अ‍ॅडव्हान्स पैसेही शेतकर्‍यांना देत आहेत. यामुळे त्यांच्यावर आर्थिक ताण पडत नसल्याने त्यांचा कल गुर्‍हाळाकडे आहे.

अक्‍कलकोट तालुक्यातील चपळगाव, घोळसगावसह अन्य गावांमध्ये गुर्‍हाळाच्या चुली पेटल्या आहेत. याशिवाय पंढरपूर, मंगळवेढा, करमाळा, दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकरीही याकडे वळत आहेत. शेजारच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी कारखान्याला ऊस घालवण्याऐवजी गुर्‍हाळ करण्यावरच भर दिला आहे. साखर कारखानदारांची मनमानी, चिटबॉयच्या असहकार्याची भूमिका, वेळेवर हप्‍ते मिळत नसल्याने शेतकर्‍यांना गुर्‍हाळाचा पर्याय फायदेशीर वाटत आहे. यामुळे जिल्ह्यातील ऊस उत्पादकांची मानसिकता बदलत आहे.

तीन लाखांमध्ये यंत्रणा उभी

घोळसगाव (ता. अक्कलकोट) येथील विजयकुमार पाटील यांनी कारखान्याला फाटा देत फक्‍त 15 दिवसांत तीन लाखांचा खर्च करून स्वतःच्या शेतात गुर्‍हाळाची यंत्रणा उभी केली आणि गुर्‍हाळ सुरु केले. यामुळे घोळसगाव परिसरात गुर्‍हाळाचे धुराडे पेटले आहेत. गुर्‍हाळासाठी लागणार्‍या साधनांच्या किंमती भरमसाठ वाढल्याने आणि खर्चिक असल्याने गूळ निर्मितीपासून शेतकरी दूर गेला होता. पण विजयकुमार पाटील यांच्यामुळे पुन्हा गुर्‍हाळाला चांगले दिवस आले आहेत. सध्या गुळाला तीन ते साडेतीन हजार प्रति क्‍विंटल दर मिळत असल्याने शेतकर्‍यांना फायदाच होत आहे.

गुर्‍हाळ व्यवसायातून अनेकांना रोजगार मिळतो. शेतकर्‍यांनी आळशी न बनता गुर्‍हाळाचे चुलवण उभे करावे. हा चांगला व्यवसाय असून यामुळे शेतकर्‍यांची आर्थिक स्थिती सुधारणार आहे.

– राचप्पा जिरगे, गुळव्या

एक महिना झाला, आम्ही ऊस पाठवण्यासाठी धडपडत आहोत. पण कोणत्याही साखर कारखान्याने याची दखल घेतली नाही. साखर साम्राटांवर विसंबून न राहता प्रत्येकांनी गूळ व्यवसायाकडे वळावे.

– शिवानंद पाटील, शेतकरी

कारखान्यांकडून ऊस उत्पादक शेतकर्‍यांची सतत जाणूनबुजून हेळसांड होत आहे. पोटच्या लेकरांप्रमाणे सांभाळलेला ऊस सध्या शेवटची घटका मोजत आहे याचे दु:ख होत आहे.

– विठ्ठल विजापुरे, ऊस उत्पादक, अंकलगी, ता. अक्कलकोट

कुठल्याच कारखान्याने ऊस नेला नाही, याचा संताप आला. शिवाय इतर शेतकर्‍यांच्या सोयीसाठी तीन लाख खर्च करुन 15 दिवसांत गुर्‍हाळाची यंत्रणा उभी केली. शेतकर्‍यांनी कारखान्यांवर विसंबून न राहता गुर्‍हाळाकडे वळावे.

– विजयकुमार पाटील, शेतकरी, घोळसगाव

Back to top button