कोरोना अपडेट : देशातील दैंनदिन रुग्णसंख्या ३ लाख पार, २४ तासांत ४९१ जणांचा मृत्यू - पुढारी

कोरोना अपडेट : देशातील दैंनदिन रुग्णसंख्या ३ लाख पार, २४ तासांत ४९१ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन

देशातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ सुरुच आहे. गेल्या २४ तासांत ३ लाख १७ हजार ५३२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ४९१ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. देशात आठ महिन्यानंतर प्रथमच दैंनदिन रुग्णसंख्येने ३ लाखांचा टप्पा पार केला आहे. तसेच कोरोना बळींची संख्यादेखील वाढली आहे. देशात सध्या १९ लाख २४ हजार ५१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. तर पॉझिटिव्हिटी रेट १६.४१ टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या २४ तासांत २ लाख २३ हजार ९९० रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. दरम्यान, ओमायक्रॉन रुग्णसंख्येतही याआधीच्या दिवशीच्या तुलनेत ३.६३ टक्के वाढ झाल्याचे दिसून आले आहे. देशात आतापर्यंत ९,२८७ ओमायक्रॉनबाधित आढळून आले आहेत.

देशात १९ जानेवारीपर्यंत एकूण ७० कोटी ९३ लाख ५६ हजार ८३० चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी १९ लाख ३५ हजार १८० चाचण्या १९ जानेवारीच्या एका दिवशी झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत दोन दिवसांत सौम्य घट नोंदवण्यात आल्यानंतर बुधवारी उच्चांकी नोंद झाली होती. दिवसभरात २ लाख ८२ हजार ९७० कोरोनाबाधितांची भर पडली होती. तर, ४४१ रूग्णांचा कोरोनाने बळी घेतला होता. दरम्यान, १ लाख ८८ हजार १५७ रूग्णांनी कोरोनावर मात मिळवली होती. बुधवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९३.८८ टक्क्यांपर्यंत घसरला होता. मंगळवारच्या तुलनेत बुधवारी दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत ४४ हजार ९५२ ने वाढ नोंदवण्यात आली होती.

मुंबईत कोरोना नियंत्रणात…

मुंबई शहरासह आसपासच्या परिसरातील कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस घट होत असून परिस्थिती नियंत्रणात आहे. मुंबईकरांना चिंतेचे कारण नाही, असा दावा बुधवारी मुंबई महानगरपालिकेने मुंबई उच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात केला. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि त्यातून आलेले निर्बंध याविषयी उच्च न्यायालयात दाखल झालेल्या जनहित याचिकांवर बुधवारी मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता आणि न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. ओमायक्रॉन विषाणू धोक्याची घंटा ठरत असून दिवसागणिक रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे महानगरपालिकेने लसीकरण, बेड व्यवस्थापन, रुग्णवाहिका व्यवस्थापन, ऑक्सिजन पुरवठा आदी उपाययोजनांची ठोस अंमलबजावणी करावी, असे निर्देश न्यायालयाने मागील सुनावणीच्या वेळी पालिका प्रशासनाला दले होते. त्यानुसार महापालिकेच्या वतीने जेष्ठ वकील अ‍ॅड. अनिल साखरे यांनी गुरुवारी प्रतिज्ञापत्र सादर केले.

६ ते ९ जानेवारीपर्यंत मुंबईमध्ये दररोज २० हजारांहून अधिक सक्रिय रुग्ण सापडत होते. परंतु आता रुग्ण संख्येत हळूहळू घट होताना दिसत असून १८ जानेवारीपर्यंत दैनंदिन रुग्णसंख्या ७ हजारांवर आली आहे. शहरातील रुग्णालय, कोविड सेंटर सर्व ठिकाणी पुरेशा खाटा, औषधांचा साठा, ऑक्सिजन पुरवठा उपलब्ध असल्याचेही साखऱे यांनी स्पष्ट केले.

मेक्सिकोत रोज ६० हजार रुग्ण

भारतासह जगभरात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. मेक्सिकोत रोज ६० हजार रुग्ण आढळून येत असल्याची माहिती एका वृत्तसंस्थेने दिली आहे.

Back to top button