सोलापूर जिल्ह्यात स्थानिक आघाडीच्या बाजुने मतदारांचा कौल - पुढारी

सोलापूर जिल्ह्यात स्थानिक आघाडीच्या बाजुने मतदारांचा कौल

सोलापूर, पुढारी वृत्तसेवा : सोलापूर जिल्ह्यातील 5 नगरपंचायत निवडणुकांचा निकाल हाती आला असून यामध्ये माढा नगरपंचायतीवर काँग्रेस, वैरागमध्ये राष्ट्रवादी, माळशिरसमध्ये भाजप, श्रीपूरमध्ये मोहिते पाटील यांची स्थानिक आघाडी, तर नातेपूते नगरपंचायतीवर मोहिते पाटील पुरस्कृत स्थानिक आघाडीने सत्ता मिळविली आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात एकंदरीत स्थानिक आघाडीच्या बाजूने मतदारांनी कौल दिल्याचे दिसून येत आहे.

माढा नगरपंचायतीच्या 17 जागांपैकी 12 जागा माजी आ. धनाजी साठे अर्थात काँग्रेसला मिळाल्या आहेत. तर या ठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी दोन तर एका ठिकाणी अपक्ष उमेदवार निवडून आला आहे. वैराग नगरपंचायतीमध्ये 17 पैकी 13 जागा राष्ट्रवादीला मिळाल्या आहेत. तर भाजपला 4 जागा मिळाल्या आहेत. या ठिकाणी आ. राजेंद्र राऊत आणि माजी मंत्री दिलीप सोपल यांना डावलून स्थानिक नेते निरंजन भूमकर यांना मतदारांनी कौल दिला आहे.

माळशिरस नगरपंचायतीमध्ये 17 पैकी 10 जागा भाजपला, 2 राष्ट्रवादी तर, 3 जागेवर अपक्ष तर 2 जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे माळशिरस नगरपंचायतीमध्ये स्थानिक आघाडीला महत्व आले असून मोहिते पाटील समर्थक असणार्‍या गटाला 10 जागा मिळाल्या आहेत.

श्रीपूर-महाळुंग या नगरपंचायतीमध्ये स्थानिक आघाडीतील मुंडफणे आणि रेडे पाटील गटाला 9 जागा, तर राष्ट्रवादीला 6 जागा मिळाल्या आहेत. भाजप आणि काँग्रेसला प्रत्येकी एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. त्यामुळे या ठिकाणी ही माजी मंत्री विजयसिंह मोहिते पाटील समर्थकांनाच सत्ता मिळाली आहे.

नातेपूते नगरपंचायतीमध्ये 17 पैकी स्थानिक आघाडीच्या बाबाराजे देशमुख आणि मामासाहेब पांढरे गटाला 11 तर विरोधी अ‍ॅड. डी. वाय. राऊत आणि दादा उराडे गटाला 6 जागा मिळाल्या आहेत. तर एका ठिकाणी अपक्ष उमदेवार निवडून आला आहे. उर्वरित जागांचे निकाल अद्याप हाती आले नाहीत. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील मतदारांनी राजकीय पक्षांना अधिक महत्व न देता स्थानिक आघाड्यांना कौल दिल्याचे या निकाला वरुन दिसून येत आहे.

Back to top button