नगर पंचायत निवडणूक : बीडमध्ये पंकजा मुंडेंचे वर्चस्व, धनंजय मुंडेंना धक्का | पुढारी

नगर पंचायत निवडणूक : बीडमध्ये पंकजा मुंडेंचे वर्चस्व, धनंजय मुंडेंना धक्का

बीड; पुढारी वृत्तसेवा : नगर पंचायत निवडणूक अपडेट : जिल्ह्यातील पाच नगर पंचायत निवडणुकीचे निकाल घोषीत झाले असून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी चार नगर पंचायतीमध्ये पॅनल उभे केले होते. यातील आष्टी, पाटोदा आणि शिरूर मध्ये भाजपने एकहाती वर्चस्व राखले. वडवणीत राष्ट्रवादी आणि आंधळे प्रणित आघाडीला काठावरचे बहुमत मिळाले. केजचा निकाल त्रीशंकू लागला असून विद्यमान सत्ताधारी असलेल्या काँग्रेसला केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागले. राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांच्या डॉक्टर कन्येचा धक्कादायक पराभव झाला.

आष्टीत पुन्हा कमळ फुलले

भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्‍या आष्टी नगरपंचायतीत भाजपने निर्विवाद वर्चस्व कायम ठेवले. एकूण 17 जागांपैकी 11 जागांवर भाजप उमेदवार विजयी झाले. एका ठिकाणी भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार विजयी झाला तर राष्ट्रवादी 2, काँग्रेस 1 व अपक्ष 2 ठिकाणी विजयी झाले आहेत.

शिरुरमध्ये भाजपला बहुमत

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शेख मेहबुब यांच्या होमपिचवर भाजपने पुन्हा एकदा वर्चस्व मिळवले. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली आ. सुरेश धस यांनी या ठिकाणची नगरपंचायत ताब्यात ठेवण्यात यश मिळवले आहे. या ठिकाणी भाजप 11, राष्ट्रवादी 4, शिवसेना 2 या प्रमाणे पक्षीय बलाबल राहिले आहे.

पाटोद्यात आ. धस यांचा बोलबाला

पाटोदा नगरपंचायत ताब्यात ठेवण्यात भाजपला यश मिळाले आहे. विरोधी पक्षांची धुळधाण उडवत या ठिकाणी भाजपचे 9 व आ. सुरेश धस गटाचे 6 असे एकून भाजपचे 15 उमेदवार विजयी झाले. राष्ट्रवादी काँग्रेस केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. काँग्रेने एक जागा जिंकली.

वडवणीत राजाभाऊ मुंडेंना धक्का

वडवणीत नगर पंचायतीची निवडणूक अतिशय अटीतटीची झाली. शेवटच्या जागेचा निकाल लागेपर्यंत कोणाची सत्ता येणार निश्चित नव्हते. 17 पैकी 16 जागांचे निकाल घोषीत झाले तेव्हा भाजप 8 आणि राष्ट्रवादी 8 अशी निकालाची उत्कंठा वाढवणारी परिस्थिती होती. शेवटी 17 व्या जागेचा निकाल घोषीत झाला आणि राष्ट्रवादी व आंधळे प्रणीत शहर बजाव आघाडीने 9 जागा जिंकून काठावरचे बहुमत मिळवले. भाजपमधील गटबाजीमुळे येथे राष्ट्रवादीचा तांत्रिकदृष्ट्या विजय झाला. वडवणीत काँग्रेस आणि सेनेला एकही जागा जिंकता आली नाही.

केजचा निकाल त्रिशंकू

केजमध्ये विद्यमान सत्ताधारी असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी, जनविकास आघाडी आणि शिवसेना अशी चौरंगी लढत झाली. यात विद्यमान सत्ताधारी काँग्रेसला केवळ 3 जागांवर समाधान मानावे लागले. राष्ट्रवादी 5, हरूण इनामदार यांची जनविकास आघाडी 8 आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एक उमेदवार विजयी झाला. एकंदरीत केजचा निकाल त्रिशंकू लागला असून कोणाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांच्या डॉक्टर कन्येचा केजमध्ये धक्कादायक पराभव झाला. शिवसेनेला खातेही उघडता आले नाही.

पालकमंत्री धनंजय मुंडे यांना धक्का

बीड जिल्ह्यातील पाच नगर पंचायतींच्या 85 जागांसाठी निवडणूक झाली. यात केवळ 17 जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले. निवडणुकी दरम्यान पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी पाचही नगर पंचायतीमध्ये जाहीर सभा घेतल्या होत्या. प्रत्येक ठिकाणी 100 कोटी रूपयांची विकासकामे करण्याचे आश्‍वासने त्यांनी दिले होते. मात्र निकालात जनतेचे राष्ट्रवादीला नाकारले असून पाच नगर पंचायतीच्या 85 जागांपैकी केवळ 17 जागेवर राष्ट्रवादीचा विजय हा पालकमंत्री धनंजय मुंडे यांना मोठा धक्का मानला जात आहे.

नगर पंचायत निवडणूक : सुरेश धस यांचे वर्चस्व सिद्ध

आष्टी, पाटोदा आणि शिरूर नगर पंचायत निवडणुकीत पंकजा मुंडे यांनी आ. सुरेश धस यांच्यावर निवडणुकीची सर्वस्वी जवाबदारी सोपवली होती. तीनही नगर पंचायतवर भाजपचा झेंडा फडकवून धस यांनी आपले वर्चस्व सिध्द केले. विशेष म्हणजे काही ठिकाणी भाजपमधील धोंडे व इतर गटांनी दिलेल्या उमेदवारांचा पराभव करून सुरेश धस यांनी उभे केलेले अपक्ष उमेदवार विजयी झाले.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : अध्यात्मिक महत्त्व असलेल्या सांगलीतले रामलिंग क्षेत्र | Ramling Sangli

Back to top button