सोलापूर : खंडणीसाठी अपहरण झालेल्या बालकाची सुटका | पुढारी

सोलापूर : खंडणीसाठी अपहरण झालेल्या बालकाची सुटका

माडग्याळ : पुढारी वृत्तसेवा : माडग्याळ (ता. जत) येथील पृथ्वीराज सुरेश बिरादार (वय 8) याचे पाच लाखांच्या खंडणीसाठी अपहरण झाले होते. वळसंग (ता. दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर) पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून कुंडल (ता.पलूस) येथून नितीन धोंडाप्पा शेडशाळ (रा. तिकोटा), लक्ष्मण किसन चव्हाण, केदार बाबासाहेब निपुजे यांना मुलासह ताब्यात घेऊन आरोपीवर गुन्हा दाखल केला. ही घटना दि. 30 डिसेंबर 2021 रोजी घडली होती.

पृथ्वीराज सुरेश बिरादार हा मूळचा बेळगिली (ता. मुधोळ, जि. बागलकोट) येथील आहे. त्याच्या वडिलांचे नुकतेच निधन झाले आहे.त्यामुळे तो त्याच्या आजोळी माडग्याळ (ता. जत) येथे राहतो. पृथ्वीराज याच्या आईने (गौरव्वाने) त्याला तिची बहीण सरुबाई येरगल (रा. धोत्री, ता. दक्षिण सोलापूर) यांच्याकडे काही महिन्यांपूर्वी शिक्षणासाठी ठेवले होते.

दि.30 डिसेंबररोजी धोत्री येथे सकाळी साडेसहाच्या सुमारास पृथ्वीराज शाळेत जात होता. त्यावेळी “तुला तुझ्या आईकडे माडग्याळ गावी सोडतो”, असे सांगून पाच लाख रुपये खंडणीसाठी त्याचे अपहरण करण्यात आले होते.

दुपारी मुलगा घरी न आल्यामुळे नातेवाईकांनी वळसंग (ता. दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर) पोलिस ठाण्यामध्ये मुलगा हरवल्याची फिर्याद दिली होती. त्या पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अतुल भोसले यांनी पोलिस नाईक रणजित भोसले व जमादार यांची पथके तयार करून तपासाची चक्रे वेगाने फिरवली.

संशयित शेडशाळ (रा. बाबानगर, ता. तिकोटा, जि. विजापूर) याने पृथ्वीराज याची आई गौरव्वा हिला फोन करुन दोन तीन वेेेळा संंपर्क केल्यामुळे पोलिसांना शंका आली. नितीन याला पोलिसांनी गोड बोलून पोलिस ठाण्यामध्ये बोलवून घेतले. प्रथम त्यानेे उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसी खाक्या दाखवताच त्याने अपहरणाची संपूर्ण हकिकत पोलिसांना सांगितली.

पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून कुंडल (ता. पलूस) येथून नितीन धोंडाप्पा शेडशाळ (रा. तिकोटा), लक्ष्मण किसन चव्हाण, केदार बाबासाहेब निपुजे यांना मुलासह ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे.

गौरवा यांच्या पतीचे निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात मोठी संपत्ती व जमीन आहे. पृथ्वीराज हा एकुलता एक मुलगा असून त्याचा काटा काढला तर सर्व संपत्ती आपल्यालाच मिळेल या हव्यासापोटी त्याचा मावस चुलता रमेश भीमगोंडा बिराजदार (रा. लोहगाव, जि. विजयपूर) याने त्याच्या अपहरणाची सुपारी दिली. नितीन शेडशाळ (रा. बाबानगर, ता. तिकोटा, जि. विजापूर) याला पाच लाखांची सुपारी बिराजदार याने दिल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. सुटका झाल्यानंतर पृथ्वीराज याची गावातून जल्लोषात मिरवणूक काढली.

Back to top button