सातारा सिटी पोलिस : पोलिस पती, पत्नी भाजले, घटनेने खळबळ | पुढारी

सातारा सिटी पोलिस : पोलिस पती, पत्नी भाजले, घटनेने खळबळ

सातारा : पुढारी वृत्तसेवा : सातारा पोलिस मुख्यालयासमोर असलेल्या सिटी पोलिस लाईनीत बुधवारी सकाळी घरामध्ये आग लागून पोलिस पती व पत्नी असलेले दाम्पत्य भाजले. या घटनेत महिला पोलिस गंभीर जखमी असून अधिक उपचारासाठी त्यांना पुणे येथे दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, प्राथमिक माहितीनुसार भडका झाल्याने ही घटना समोर आल्याचा प्राथमिक जबाब महिला पोलिसाने दिला आहे.(सातारा सिटी पोलिस)

महिला पोलिस संगिता जेटाप्पा लोणार (काळेल) व पती जेटाप्पा लोणार (दोघे रा. पोलिस वसाहत, सातारा) असे जखमी झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, संगीता या भरोसा सेलमध्ये तर जेटाप्पा हे महामार्ग पोलिस म्हणून कर्तव्य बजावत आहेत. बुधवारी सकाळी सिटी पोलिस लाईनीत ते राहत असलेल्या घरातून धूराचे व आगीचे लोट येवू लागल्याने परिसर हादरुन गेला. आरडाओरडा झाला असता लोणार दाम्पत्य भाजल्याचे समोर आले.

जखमी अवस्थेत दोघांना तात्काळ उपचारासाठी सिव्हील रुग्णालयात हलवले. सातारा पोलिस दलात या घटनेची माहिती समोर आल्यानंतर पोलिस अधिकारी, कर्मचारी यांनी घटनास्थळी व रुग्णालयात धाव घेतली. महिला पोलिसाचा प्राथमिक जबाब घेतला आहे.

सातारा सिटी पोलिस :पेटलेल्या अवस्थेतील संगिता यांना वाचवण्याचा प्रयत्न

त्यानुसार प्राथमिक माहिती अशी, बुधवारी सकाळी पती जेटाप्पा हे स्नानगृहात गेले होते. पत्नी स्वंयपाक करत असताना घरातील कापाटावर ठेवलेली पेट्रोलची बाटली अचानक खाली पडल्याने शेजारीच असलेल्या गॅसचा भडका झाला. यात संगिता भाजल्या व ही घटना पाहून पती जेट्टापा स्नानगृहातून बाहेर आले व त्यांनी पेटलेल्या अवस्थेतील संगिता यांना वाचवण्याचा प्रयत्न केला.

यात ते देखील भाजले. प्राथमिक उपचार केल्यानंतर महिला पोलिस संगिता या 55 टक्के भाजल्याने व त्यांची प्रकृती चिंताजनक बनल्याने त्यांना पुणे येथे हलवण्यात आले.

याबाबत पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल म्हणाले, दोन्ही पोलिसांवर उपचार सुरु आहेत. प्राथमिक जबाब झाला आहे. उपचारानंतर आणखी दोन दिवसांनी पुन्हा जबाब घेतला जाणार आहे. याप्रकरणी कोणतीही तक्रार असेल त्यानुसार पुढील कारवाई करणार आहोत.

Back to top button