Gokul Director : ‘गोकुळ’ संचालकाचा एकेरी शब्दात उल्लेख केल्याने एकास बेदम मारहाण | पुढारी

Gokul Director : ‘गोकुळ’ संचालकाचा एकेरी शब्दात उल्लेख केल्याने एकास बेदम मारहाण

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : कोरोना लसीकरणप्रश्नी आयोजित आंदोलनात नेत्यांचा एकेरी भाषेत उल्लेख केल्याचा जाब विचारत बहुजन मुक्ती पार्टीचे गगनबावडा तालुकाध्यक्ष ज्ञानदेव बापू कांबळे (रा. मणदूर) यांना ‘गोकुळ’ संचालक बयाजी शेळके याच्यासह सहाजणांनी बेदम मारहाण केल्याचा गुन्हा गगनबावडा पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. संशयितांनी रविवारी (दि. 9) दुपारी एकच्या सुमारास साळवण चौकात आणून जबर मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. (Gokul Director )

याबाबत गगनबावडा पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, बहुजन मुक्ती पार्टीतर्फे कोरोना लसीकरणाविरोधात आंदोलन करण्यात आले होते.

या आंदोलनात फिर्यादी ज्ञानदेव कांबळे यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्याविषयी केलेल्या भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

Gokul Director : शेतातून मुख्य चौकात आणत मारहाण

या व्हिडीओचा आधार घेत आपल्या नेत्यावर एकेरी भाषेत टीका केल्याच्या रागापोटी ‘गोकुळ’चे विद्यमान संचालक बयाजी शेळके, डी. वाय. पाटील साखर कारखान्याचे संचालक सहदेव कांबळे, सूर्यकांत पडवळ आदींसह कार्यकर्त्यांनी मारहाण केली. ज्ञानदेव कांबळे यांना मांडुकली येथील शेतातून साळवण येथील मुख्य चौकात आणले.

तेथे ‘गोकुळ’चा संचालक बयाजी शेळके याने त्यांना सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ दाखवला व सर्वांनी दमदाटी करत व शिवागाळ करत तेथे उपस्थित सर्वांनी लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याची माहिती गगनबावडा पोलिसांकडून देण्यात आली.

मारहाण करणारे संशयित आरोपी सहदेव कांबळे, तुकाराम पाटील (दोघेही रा. कोदे), बयाजी शेळके (रा. असळज), सूर्यकांत पडवळ (मांडुकली), नीलेश म्हाळुंगेकर, शिवाजी राऊत (साळवण-निवडे) यांच्यावर गगनबावडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक रणजित पाटील करत आहेत.

हे ही वाचा : 

Back to top button