ऊस पीक कर्जात २२ टक्क्यांपर्यत वाढीची शिफारस | पुढारी

ऊस पीक कर्जात २२ टक्क्यांपर्यत वाढीची शिफारस

सांगली: पुढारी वृत्तसेवा : शेतकर्‍यांना 2022 -2023 च्या हंगामासाठी देण्यात येणार्‍या (ऊस) पीक कर्जात सात टक्क्यापासून पन्नास टक्क्यांपर्यंत वाढ करण्याची शिफारस राज्यस्तरीत तांत्रिक समितीकडे करण्याचा निर्णय जिल्हास्तरीय तांत्रिक समितीने घेतला आहे.

जिल्हा बँकेत जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय तांत्रिक समितीची बैठक झाली. यावेळी बँक ऑफ इंडियाचे महेश हरणे, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक एल. पी. धानोरकर, बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी जयवंत कडू-पाटील, बँकेचे संचालक अजितराव घोरपडे यांच्यासह समितीचे सदस्य असणारे कृषी विद्यापीठाचे प्रतिनिधी, प्रगतशील शेतकरी, कृषी खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यातील हवामान, भौगोलिक परिस्थिती, पीक परिस्थिती, पाऊसमान, हवामान, पीक उत्पादनासाठी येणारा खर्च, त्याला मिळणारा दर या गोष्टींचा विचार करून पीक कर्ज दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही वाढ आठ टक्क्यांपासून ते अगदी पन्नास टक्क्यांपर्यंत आहे. द्राक्ष पिकासाठी सर्वात कमी म्हणजे 8 टक्के तर, तुती लागवडीसाठी सर्वाधिक म्हणजे पन्नास टक्के पीक कर्ज वाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पीक कर्जासाठी 2021-22 साठी असणारा कर्ज दर व कंसात 2022-23 साठी शिफारस करण्यात आलेले दर हेक्टरमध्ये असे : भात 40000 (50000), उडीद 20000 (22000), सोयाबिन 40000 (50000), सूर्यफूल 20000 (25000), कापूस 50000 (55000), ऊस सुरू 105000 (125000), ऊस आडसाली 131000 (140000), ऊस पूर्वहंगामी 105000 (125000), खोडवा 105000 (125000), ज्वारी 30000 (35000), द्राक्ष सर्वसाधारण 300000 (325000), निर्यातक्षम 325000 (325000), तुती लागवड 10000 (15000), म्हैस 8000 (12000), मेहसाना म्हैस, संकरीत गाई 10000 (14000).

Back to top button