

Shiv Sena VSR Aircraft Ban Decision: अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापल असतानाच शिवसेनेने (शिंदे गट) सुरक्षेबाबत ठोस भूमिका घेतली आहे. पक्षाच्या कामासाठी किंवा नेत्यांच्या दौऱ्यांसाठी ‘VSR’ कंपनीच्या विमानांचा आणि हेलिकॉप्टरचा वापर न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पक्षातील आमदार आणि वरिष्ठ नेत्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत सुरक्षेच्या मुद्द्यावर चिंता व्यक्त केली होती. ज्या कंपनीच्या विमानाचा अपघात झाला, त्या कंपनीच्या तांत्रिक मानकांबाबत प्रश्न निर्माण होत असताना भविष्यात धोका पत्करणे योग्य नाही, असा युक्तिवाद करण्यात आला. या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी तत्काळ निर्णय घेतला आहे.
शिवसेनेचे आमदार, मंत्री तसेच स्वतः शिंदे यापुढे ‘VSR’ कंपनीच्या विमानातून प्रवास करणार नाहीत. हा निर्णय पक्ष पातळीवर अधिकृतरीत्या मान्य करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते आहे. दरम्यान, संबंधित अपघातातील विमान हे चार्टर्ड ‘लेअर जेट’ प्रकारातील असल्याचे समोर आले होते.
या घटनेनंतर नागरी उड्डाण क्षेत्रातील नियामक संस्था Directorate General of Civil Aviation (DGCA) यांनी VSR कंपनीच्या लेअर जेट विमानांच्या उड्डाणांवर निर्बंध घातल्याची माहिती आहे. त्यामुळे या कंपनीच्या सुरक्षाविषयक बाबींवर अधिक बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर केवळ राजकीयच नव्हे, तर सुरक्षाविषयक प्रश्नही केंद्रस्थानी आले आहेत. सरकारी पातळीवर आणि पक्षीय स्तरावर विमान प्रवासाबाबत अधिक दक्षता घेतली जात असल्याचे या निर्णयावरून स्पष्ट होते. शिवसेनेच्या या भूमिकेमुळे इतर पक्ष देखील आपल्या प्रवास व्यवस्थेचा आढावा घेतील का, याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.