

Rohit Pawar Yugendra Pawar Aggressive About Ajit Pawar Plane Crash Baramati:
अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार बारामती पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. त्यांच्या सोबत युगेंद्र पवार आणि वकिलांचा मोठा ताफाही उपस्थित आहे.
रोहित पवार यांनी यापूर्वी मुंबईतील मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात डीजीसीए आणि संबंधित व्हीएसआर कंपनीविरोधात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, डीजीसीएविरोधात थेट गुन्हा नोंदवण्यास पोलिसांनी नकार दिला. तपास करून आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले.
दरम्यान, बारामतीत परिस्थिती वेगळीच दिसून आली. रोहित पवार तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात पोहोचताच समर्थकांनी मोठ्या संख्येने पोलिस स्टेशनबाहेर गर्दी केली. हातात पोस्टर्स, घोषणाबाजी आणि FIR झालाच पाहिजे अशी मागणी केली.
युगेंद्र पवार यांनीही या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली आहे. संबंधित कंपनी आणि अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई व्हावी, अशी त्यांची मागणी आहे. अजित पवार यांच्या निधनाला केवळ अपघात म्हणून न पाहता त्यामागील कारणांचा सखोल तपास व्हावा, यावर पवार कुटुंबीय ठाम असल्याचे दिसते.
बारामती पोलीस ठाण्याबाहेर वाढती गर्दी आणि घोषणाबाजीमुळे काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी बंदोबस्त वाढवला. मात्र, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि आक्रमक भूमिका कायम आहे.
या घडामोडींमुळे अजित पवार यांच्या अपघातप्रकरणी तपास आणि संभाव्य कारवाई याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. पुढील काही दिवसांत प्रशासन कोणती भूमिका घेते आणि गुन्हा नोंदवण्याबाबत काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष आहे.