

Sharad Pawar on Parth Pawar Land Case: पुण्यातील कोरेगाव पार्क येथील जमीन खरेदी व्यवहारावरून राज्यात नवीन राजकीय वाद निर्माण झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार आणि त्यांच्या ‘अमेडिया एलएलपी’ या कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रकरणावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
अकोल्याच्या दौऱ्यावर असताना पत्रकारांनी त्यांना विचारलं की, राज्य सरकार पार्थ पवारांना वाचवण्याचा प्रयत्न करतंय का? त्यावर शरद पवार म्हणाले “राज्य सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमली आहे. त्या समितीच्या अहवालातून सत्य समोर येईल. आधी निष्कर्ष न काढता तपासाची दिशा पाहणं आवश्यक आहे.”
पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना शरद पवार पुढे म्हणाले “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः हा विषय गंभीर असल्याचं म्हटलं आहे. जेव्हा राज्यातील मुख्यमंत्री एखाद्या प्रकरणाला गंभीर मानतात, तेव्हा त्यावर सखोल चौकशी होणं अपेक्षित आहे. चौकशीचं वास्तव चित्र जनतेसमोर आलं पाहिजे.”
या प्रकरणावर खासदार सुप्रिया सुळे यांनी पार्थ पवार यांच्याविषयी मवाळ भूमिका घेतली होती. या संदर्भात विचारले असता शरद पवार म्हणाले “त्यांचं मत वेगळं असू शकतं. प्रत्येकालाच आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे.”
पत्रकारांनी विचारलं की कुटुंब प्रमुख म्हणून आपण या प्रकरणाकडे कसं पाहता? त्यावर शरद पवार शांतपणे म्हणाले “प्रशासन, राजकारण आणि कुटुंब या तीन गोष्टी वेगळ्या आहेत. आम्ही राजकारणात कधीही कुटुंब ओढून आणत नाही. आमच्यात विचारांचा संघर्ष असू शकतो, पण तो नेहमी विचारधारेवर आधारित असतो.
माझा नातू अजित पवारांच्या विरोधात निवडणूक लढला, तर अजित पवारांच्या पत्नी माझ्या मुलीच्या विरोधात उभ्या राहिल्या होत्या. राजकारणात कुटुंब नाही, विचार महत्वाचा असतो.”