

सातारा : विठ्ठल हेंद्रे
शाहूनगरमध्ये वकील व त्यांच्या कारवर तुफानी हल्ला चढवत युवकांच्या झुंडीने अक्षरश: थरकाप उडवून दिला. 'वाहनाला जाण्यासाठी जागा द्या,' या तात्कालिक कारणातून वकिलावर कायमस्वरुपी एक डोळा गमावण्याची वेळ आली. दरम्यान, भगवा, शाहू चौक व जगतापवाडी रोड हॉट स्पॉट बनले आहेत. रात्री उशिरापर्यंत टोळके थांबत असल्याने वाहन चालकांची पंचाईत होत असून, महिलांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झालेे आहे.
किल्ले अजिंक्यतारा व चारभिंतीवर जाण्यासाठी शाहूनगर येथून प्रमुख रस्ता आहे. गोडोलीतील साईबाबा मंदिरापासून हा प्रमुख रस्ता असला तरी इतरही रस्ते आहेत. यामध्ये पोवई नाक्यावरुन भगवा चौक, राजपथावरील शाहू चौक व रामराव पवार नगरमधून देखील प्रमुख रस्ते आहेत. शाहूनगर हा परिसर शांत असून रहिवासीदेखील शांतताप्रिय. नगरपालिकेच्या वाढत्या हद्दीमुळे शाहूनगरचे वलय आणखी वाढले आहे. दुर्दैवाने मात्र, शाहूनगरसारख्या शांत परिसराला गत आठवड्यामधील राड्यामुळे गालबोट लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून शाहूनगरमधील प्रमुख चौका-चौकांमध्ये युवकांच्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. शाहूनगर परिसरात जाण्यासाठी प्रमुख तीन चौक आहेत. यामध्ये जुना अजिंक्य बझार असलेल्या परिसराला आता शाहू चौक अशी ओळख निर्माण झाली आहे. येथूनच जगतापवाडी रोड आहे. तसेच मोनार्क हॉटेलपासून जाताना काळोखे चौक अलीकडे भगवा चौक असून येथेच वकिलावर प्राणघातक हल्ला झाला होता. या तीन ठिकाणी हुल्लडबाजी वाढली आहे.
शांतताप्रिय असणार्या शाहूनगरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पीसीआर, बीट मार्शल या पथकांची गस्त वाढवण्याची गरज निर्माण झाली आहे. केवळ पोलिसांची व्हॅन व दुचाकी दिसली तरी हुल्लडबाजांवर मर्यादा येणार आहेत. अनेकदा स्थानिक परिसरातील युवकांऐवजी बाहेरच्या परिसरातील हुल्लडबाज धिंगाणा घालत आहेत. त्यामुळे अशा टोळक्यांवर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.