सातारा : पुढारी वृत्तसेवा
शेतकर्यांना दिवसा वीज मिळावी, यासाठी लढा उभारला असून यासाठी तज्ञ समिती नेमण्यात आली आहे. शेतीसाठी दिवसा वीज देणे शक्य आहे. याबाबतचा प्रस्तावही आम्ही सरकारला दिला असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, महाराष्ट्रात सध्या राजकीय टोळीयुध्द सुरू असल्याची टीकाही त्यांनी केली.
खा. राजू शेट्टी म्हणाले, राज्यात 23 हजार मेगा वॅट वीज लागते. त्यातील सुमारे 6 हजार मेगा वॅट वीज ही शेतकर्यांना दिली जाते. परंतु, सरकारकडून क्षमतेएवढी वीज निर्मिती केली जात नाही. खासगी कंपन्यांचा फायदा व्हावा, यासाठी हे प्रकल्प अपुरे चालवले जात आहेत. खासगी प्रकल्पांकडून 20 रुपयांना वीज खरेदी केली जात आहे. जमिनी देण्यापासून ते धरणे बांधण्यापर्यंत सर्व त्याग हा शेतकर्यांनी केला आहे. मात्र, त्याच्याकडेच सरकार दुर्लक्ष करत आहेत.
महावितरणकडून शेतकर्यांची फसवणूक करून व दिशाभूल देणारी आकडेवारी मांडून दिवसा वीज देणार नसल्याचा युक्तिवाद अधिकार्यांकडून करण्यात येतो. मात्र, त्याला आम्ही सविस्तर प्रस्ताव तयार करून उत्तर दिले आहे. या प्रस्तावाप्रमाणे कार्यवाही झाल्यास शेतकर्यांना दिवसा वीज पुरवठा करणे शक्य होणार आहे. यासाठी तज्ञ समिती सरकारने नेमली आहे. सरकारने यावर सकारात्मक प्रतिसाद न दिल्यास आक्रमक भूमिका घेणार आहे.
महावितरणमध्ये वर्षाला 25 ते 30 हजार कोटी रुपयांचा घोटाळा होतो. जसा साप झाडाला वेटोळे घालून बसतो तसे पांढर्या कपड्यातील दरोडेखोर हे धरणांना वेटोळे घालून बसले आहेत.
महाराष्ट्रातील सुरू असलेल्या परिस्थितीवर प्रतिक्रिया विचारली असता राजू शेट्टी म्हणाले, महाराष्ट्रात राजकीय युद्ध सुरू असून दोन्ही बाजूंकडून सोयीचे आरोप केले जात आहेत. भाजपमध्ये असलेल्या कारखानदारांनी शेतकर्यांचे पैसे बुडवले नाहीत का? तसेच महाविकास आघाडीतील नेते काय साधू संतासारखे आहेत का? असा सवाल शेट्टी यांनी केला. राज्यपालांना दिलेल्या आमदारांच्या यादीत तुमचे नाव आहे का? असे विचारले असता ते म्हणाले यादीत काय आहे हे मला माहीत नाही, असे सांगितले.
किसनवीर कारखाना कर्ज न दिल्याने बंद पडला का? असे विचारले असता ते म्हणाले, फक्त कर्ज न दिल्याने किसनवीर कारखाना बंद पडला, असे म्हणता येणार नाही. यासाठी तेथील गैरव्यवस्थापन आणि भ्रष्टाचार कारणीभूत आहे. देवेंद्र फडणवीस सांगतात तसे नाही, असेही शेट्टी म्हणाले.