इस्लामपुरात पाणीपुरवठ्याची ‘सेल्फ सर्व्हिस’ | पुढारी

इस्लामपुरात पाणीपुरवठ्याची ‘सेल्फ सर्व्हिस’

इस्लामपूर; सुनील माने : इस्लामपूर नगरपरिषदेच्या इतिहासात प्रथमच लोकांना मंगलमय तसेच दुःखदप्रसंगी पिण्याचा पाण्याचा टँकर पुरवण्यासाठी ट्रॅक्टर अथवा वाहन नाही. सर्वच्या सर्व ट्रॅक्टर बंद अवस्थेत असल्याने लोकांनी स्वतः ट्रॅक्टर आणून पाणी न्यावे लागत आहे. त्यामुळे ‘सेल्फ सर्व्हिस’ची चर्चा आता शहरात रंगू लागली आहे.

पालिकेवर प्रशासक आहे. निवडणुका आल्या आहेत. तर पाणीपुरवठ्यासाठी वाहनांची उपलब्धता नाही. गेल्या पाच वर्षांत आडवा-आडवी, जिरवा-जिरवीचे राजकारण टोकास पोहोचले. नगराध्यक्ष भाजपचा तर इतर पदाधिकारी राष्ट्रवादीचे असल्याने जनसुविधांचा बोर्‍या वाजला आहे.

आता तर निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. ना. जयंत पाटील यांच्या माध्यमातून कोट्यवधींचा निधी येत आहे. मात्र श्रेयवादात कामे रखडत आहेत. ना. जयंत पाटील यांनी नगरपरिषदेतील अत्यावश्यक सेवेच्या वाहनांच्या खरेदीसाठी सकारात्मक पाऊल उचलणे गरजेचे आहे.

नगरपालिकेची वाहने दुरुस्तीसाठी नेत असताना कामेरीजवळ झालेल्या अपघाताने उल्या सुरल्या वाहनांचाही चक्काचूर झाला आहे. शहराची लोकसंख्या लाखाच्या घरात आहे. शहरात दोन-तीन दिवसांतून किमान एक तरी मृत्यू होतो.

अशा दुःखात कार्यक्रमासाठी पाणी नसणे हे त्या त्या लोेकांना त्रासदायक ठरत आहे. यातून खासगी टँकर मालक तेजीत आहेत. पालिकेत सध्या 8 घंटागाड्या, 2 अग्निशमक, 1 व्हेनॉन गाडी, 1 कॉम्पॅक्टर आहे. हा कॉम्पॅक्टरही बंद आहे.

ऐनवेळी संकटात दुसर्‍याला मदत करण्यासाठी इस्लामपूर नेहमीच पुढे आले आहे, मात्र सध्या नगरपरिषदेच्या वाहनांना लागलेली घर-घर कधी थांबणार, असा सवाल होत आहे.

इस्लामपूर पालिकेकडे ट्रॅक्टरच नाहीत. एक ट्रॅक्टर होता त्याचाही गेल्या काही दिवसांपूर्वी अपघात झाला. आता नवीन ट्रॅक्टर घेण्यासाठी प्रशासनाने प्रक्रिया सुरू केली आहे. येत्या 15 दिवसात ट्रॅक्टर येतील. शहरात ट्रॅक्टरद्वारे करण्यात येणारा पाणीपुरवठा लवकरच सुरळीत करू. – वैभव साबळे मुख्याधिकारी-प्रशासक, इस्लामपूर नगरपालिका.

Back to top button