

महाबळेश्वर (सातारा) : पुढारी वृत्तसेवा
सध्या उन्हाळी हंगामामुळे महाबळेश्वर, पाचगणीत पर्यटक दाखल होऊ लागले आहेत. अवघ्या महाराष्ट्रात तापमानाने उच्चांक गाठला असताना महाबळेश्वरमध्ये मात्र, रात्री पडणार्या थंडीमुळे पर्यटक सुखावत आहेत. दिवसा उष्णता असली तरी रात्री थंडी, असा वातावरण बदलाचा अनुभव पर्यटक अनुभवत आहेत. सायंकाळी नौकाविहारासाठी प्रसिद्ध असलेल्या वेण्णा लेकवर पर्यटकांची गर्दी येणार्या सुट्ट्यांमुळे वाढणार आहे.
एकीकडे उभा महाराष्ट्र उष्णतेच्या लाटेने होरपळून निघत असताना महाबळेश्वर मात्र, त्याला अपवाद आहे. येथे दुपारचे काही तास सोडल्यास सकाळी व सायंकाळी हवेत सुखद गारवा अनुभवायास मिळत आहे. सध्या उन्हाळी हंगामाच्या पार्श्वभूमिवर महाबळेश्वरला पर्यटकांची पावले वळत आहेत. महाबळेश्वरमधील सर्वात उंच असलेल्या विल्सन पॉईंट येथे सुटणार्या थंडगार वार्याचा अनुभव घेण्यासाठी व निवांतपणासाठी पर्यटकांची पावले येथे वळताना दिसत आहेत.
येणार्या दोन-तिन दिवसांच्या सुट्ट्यांमुळे येथे पर्यटकांची आवक वाढू लागली आहे. विविध पाईंट हळूहळू बहरू लागले आहेत. सूर्यास्ताचे मनोहारी दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी आगामी दोन ते तीन दिवसात येथे वाढेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
महाबळेश्वरपासून जवळच असलेला ऐतिहासिक किल्ले प्रतापगड, शिवकालीन खेडेगाव, मिनी काश्मीर म्हणून ओळखले जाणारे तापोळा पाहण्यासाठी पर्यटक आवर्जून त्याठिकाणी भेट देतात. येथील नौका विहारासाठी प्रसिद्ध असलेले वेण्णा लेक आगामी चार-पाच दिवस चांगलेच बहरणार आहे.
पर्यटक प्रेक्षणीय स्थळे पाहिल्यानंतर खरेदीच्या मूडमध्ये सायंकाळी बाहेर पडतो. खरेदीसाठी येथील मुख्य बाजारपेठही आगामी काळात चांगलीच फुलणार यात शंकाच नाही.दरम्यान उष्णतेने अवघे समाजमन त्रासून गेले असताना महाबळेश्वर येथे मात्र उन्हाळ्याच्या दिवसातही पर्यटक रात्रीच्यावेळी थंडीचा सुखद अनुभव घेत आहेत.