रत्नागिरी जिल्ह्याला मोठा दिलासा! भारनियमन होणार नाही | पुढारी

रत्नागिरी जिल्ह्याला मोठा दिलासा! भारनियमन होणार नाही

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : उन्हाळ्यात विजेची मागणी प्रचंड वाढल्याने काही ठिकाणी आपत्कालीन भारनियमन करण्यात येत आहे. मात्र, वीज चोरीचे प्रमाण कमी आणि वीज बिल भरण्यात जिल्ह्यातील ग्राहक अग्रेसर असल्यामुळेच जिल्ह्यात आपत्कालीन भारनियमन होणार नसल्याची दिलासादायक माहिती महावितरणकडून देण्यात आली आहे.

वाढत्या उष्म्यामुळे विजेची वाढलेली मागणी, कोळसा टंचाई व देखभाल दुरुस्तीसाठी औष्णिक संच बंद आहेत. वीज निर्मितीत घट झाल्यामुळे मागणी व पुरवठ्यात असमतोल निर्माण होऊन वीज टंचाईची स्थिती उद्भवली आहे. वीज उपलब्धतेसाठी महावितरणकडून प्रयत्न सुरू आहेत. याप्रसंगी नागरिकांनी विजेचा काटकसरीने वापर करावा, असे महावितरणचे आवाहन आहे.

प्रामुख्याने कोरोना कालावधीत महावितरणची वीज मागणी 22000 मेगावॅटच्या आसपास स्थिरावली होती. मात्र, यंदा 24700 मेगावॅटचे शिखर गाठले आहे. राज्याची मागणी 28000 मेगावॅटपर्यंत पोहोचली आहे. जिल्ह्यात सध्या 155 मे. वॅट विजेची मागणी आहे.

विजेच्या मागणीच्या तुलनेत पुरवठा अपुरा होत असल्यास वीज यंत्रणा कोलमडू नये, या हेतूने वीजयंत्रणेवर येणारा ताण (भार)कमी करण्यासाठी महावितरणकडून भारव्यवस्थापन केले जाते. कळवा (मुंबई) येथील राज्य भार प्रेषण केंद्राकडून कोणत्या वीज वाहिन्यांवर किती वेळ वीजपुरवठा बंद करून भारव्यवस्थापन करावयाचे आहे. या संदर्भात आदेश दिले जातात. या आदेशाचे क्षेत्रीय स्तरावर तंतोतंत पालन करणे निकडीचे असते. अन्यथा वीज यंत्रणेला धोका पोहोचू शकतो. आपत्कालीन परिस्थितीत भारव्यवस्थापनासाठी ठराविक गटातील वीजपुरवठा बंद करण्याची वेळ अनिश्चित वा अनियोजित असते.

वितरण व वाणिज्यिक हानी म्हणजे संबंधित 11 के.व्ही. वीज वाहिनीवरील वीज गळती व वीज बिल वसुलीच्या प्रमाणाचे गुणोत्तर होय. त्यानुसार 11 के.व्ही. वीज वाहिन्यांचे ए, बी, सी, डी, ई, एफ, जी1, जी2, जी3 असे विभाजन केले जाते. भारव्यवस्थापन करताना वीज गळती अधिक व वीज बिल थकबाकी कमी असलेल्या गटातील 11 के. व्ही. वीज वाहिन्यांवरील वीजपुरवठा आवश्यकतेनुसार बंद केला जातो.

जिल्ह्यात वीज चोरी नगण्य

रत्नागिरी जिल्ह्यात वीज चोरीचे प्रमाण नगण्य असून, वीज बिल थकबाकीही कमी आहे. जिल्ह्यातील सर्व फिडर ए, बी, सी, डी या वर्गवारीत मोडतात. मात्र, सध्याचे भारनियमन हे ई, एफ, जी-1, जी-2, जी-3 या वर्गवारीत आपत्कालीन भारनियमन करण्यात येत आहे.

Back to top button