पुढारी वृत्तसेवा , कराड : अशोक मोहने
शिवारात सध्या खोडवी कुळवणीची कामे हातघाईवर आली आहेत. शिवाय जनावरांच्या चार्यासाठी मका तसेच भाजीपाला पिकांसाठी शेतकर्यांना खतांची गजर निर्माण झाली आहे. युरिया खताला मागणी वाढली आहे. ही बाब लक्षात घेऊन खत विक्रेत्यांनी शेतकर्यांची आर्थिक पिळवणूक सुरू केली आहे. युरिया खताबरोबर अन्य खते व कीटकनाशके शेतकर्यांच्या माथी मारली जात आहेत. कृषी विभागाने अशा खत विक्रेत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे.
सध्या युरियाचे पोते 270 ते 280 रूपयांना मिळत आहे. शासन युरिया व डीएपीवर अनुदान देते. महिना भरापासून युरियाचे दर वाढले आहेत. सध्या ऊस तोडी सुरू आहेत. ऊस गेल्यानंतर शेतकरी शेताची साफसफाई करून शेत खोडव्यासाठी तयार करत आहे. ऊसाला फुटवा चांगला यावा, वाढ चांगली व्हावी यासाठी शेतकरी युरीया, डीएपी खत खरेदी करत आहे. शेतकर्यांची युरियाची गरज लक्षात घेऊन खत विक्रेत्यांनी युरिया व डीएपी खताची कृत्रिम टंचाई निर्माण केली आहे. युरियाचे दर अचानक कसे वाढले हे शेतकर्यांच्या लक्षात आले आहे. युरियाच्या पोत्याबरोबर नॅनो युरिया घेण्यास काही खत विक्रेत्यांकडून सांगितले जात आहे. नॅनो युरिया द्रव रूपात उपलब्ध असून एका बाटलीची किंमत 410 रूपये आहे. या शिवाय 102626, 1919, 123216 किंवा इतर खतेे घेण्यासाठी सक्ती केली जात आहे. कीटकनाशक, तन नाशक घेण्यासाठीही शेतकर्यांना प्रवृत्त केले जात आहे. शेतकरी अगोदरच अडचणीत असताना त्याच्या माथी अन्य खते मारली जात आहेत.
सध्या ऊसाच्या तोडी सुरू आहेत. शेतकरी खोडवा जोमाने आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. शिवाय उन्हाळ्यामुळे जनावरांच्या चार्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी शेतकरी मका पीक घेत असतो. शेत रिकामे झाल्याने अल्प मुदतीची भाजीपाल्याची पिकेही शेतकरी घेत असतो. या पिकांच्या वाढीसाठी शेतकर्यांना खताची मात्रा द्यावी लागत आहे. नेमक्या याच वेळी युरिया व डीएपीची कृत्रिम टंचाई निर्माण करण्यात आली आहे. शिवाय लिंकिंग करून अन्य खते व किटकनाशके शेतकर्यांना घेण्यास प्रवृत्त केले जात आहे. यातून शेतकर्यांची फसवणूक होत आहे. कृषी विभागाने शेतकर्यांची अर्थिक पिळवणूक करणार्या व खतांचे लिंकिंग करणार्या खत विक्रेत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी रयत शेतकरी संघटनेने केली आहे.