डॉक्टरांचा सल्ला घेताना आजाराबाबाबतची संपूर्ण माहिती द्या | पुढारी

डॉक्टरांचा सल्ला घेताना आजाराबाबाबतची संपूर्ण माहिती द्या

आजार कोणताही असो अचूक उपचार केल्यास तो वेळेत बरा होतो किंवा नियंत्रणात तरी येतो. यासाठी रुग्णाने डॉक्टरांना सहकार्य करणे आणि आजाराची संपूर्ण माहिती देणे गरजेचे आहे. अर्धवट माहितीच्या आधारे उपचार हे रुग्णांना पूर्णपणे बरे करू शकत नाहीत.

जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अहवालानुसार, दरवर्षी लाखो नागरिक योग्य उपचाराअभावी आपला जीव गमावतात. प्रत्यक्षात बरेच रुग्ण डॉक्टरांना सहकार्य करत नाहीत आणि त्यांना अचूक माहिती देत नाहीत. त्यामुळे डॉक्टरांना देखील उपचाराचे नियोजन करता येत नाही.

डॉक्टरांकडे आपल्या सवयीची, व्यसनांची संपूर्णपणे माहिती देणे आवश्यक आहे. आपण अँटी डिप्रेशनची औषधे घेत असाल आणि धूम्रपान करत असाल तर या औषधाचा उलटा परिणाम देखील होऊ शकतो. त्यामुळे धूम्रपान करतो की नाही किंवा त्याचे किती प्रमाण आहे यासंदर्भात माहिती द्यावी.

मद्यपान करणारे रुग्ण जेव्हा डॉक्टरांकडे वैद्यकीय सल्ला मागण्यासाठी जातात तेव्हा ते या व्यसनाविषयी सांगत नाहीत. एवढेच नाही तर ही सवय सांगण्याची त्यांना आवश्यकताही वाटत नाही. परंतु आपण मद्यपान करत असाल तर डॉक्टरना त्याची माहिती द्या. कारण अशा मंडळींना पेनकिलर किंवा कॉलेस्ट्रॉलच्या गोळ्या काळजीपूर्वक दिल्या जातात. काही औषधांनी नुकसान देखील होऊ शकते. मधुमेहाचा त्रास असेल तर नर्व्हची हानी होऊ शकते. अल्कोहोल घेणारी व्यक्ती जर झोपेची गोळी घेत असेल तर तो कोमात जाऊ शकतो.

आजकाल बहुतांश जण सामान्य आजार जसे की खोकला, सर्दी, पोटदुखी, डोकेदुखी यासारख्या आजारासाठी स्वत:च मेडिकल स्टोअरमधून गोळ्या-औषधे खरेदी करतात. याचा फायदा जेव्हा होत नाही, तेव्हा ते डॉक्टरकडे जातात. तेव्हा ते त्रास सांगतात. परंतु आपण त्यासाठी अगोदर कोणत्या गोळ्या घेतल्या, हे मात्र सांगत नाहीत. पण या गोळ्या रक्तदाब, हृदयाशी निगडित दुखणे, मधुमेह आदींची जोखीम वाढवण्याचे काम करू शकतात. पोटातील गॅसेसपासून दिलासा मिळण्यासाठी घेण्यात येणार्‍या गोळ्या या रक्तदाब आणि किडनी रुग्णांना अडचणीत आणू शकतात.

अनेकदा मधुमेहग्रस्त रुग्ण हा डॉक्टरांना आपल्या डायटची माहिती देत नाही. त्यामुळे अचूक उपचार होण्याऐवजी अडचणीत भर पडते. सांगण्याचे तात्पर्य एवढेच की, कोणत्याही आजारात डॉक्टरांचा वैद्यकीय सल्ला घेताना आजाराबाबाबतची संपूर्ण माहिती देणे हिताचे राहिल.

डॉ. सुुनीलकुमार जाधव

Back to top button