वैयक्‍तिक ऑलिम्पिक पदकाचा कुस्तीनेच केला श्रीगणेशा

वैयक्‍तिक ऑलिम्पिक
वैयक्‍तिक ऑलिम्पिक
Published on
Updated on

सातारा : पुढारी वृत्तसेवा
सातारा शहर म्हटलं की अनेक जुन्या तालमींचं आगर आणि नामवंत पैलवानांचं शहर. स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळातही हा नावलौकिक कायम राहिला. याच सातार्‍यातील खाशाबा जाधव यांनी कुस्तीतील देशासाठी पहिले वैयक्‍तिक आलिम्पिक पदक जिंकले होते. सातार्‍याचे आणखी एक पैलवान बाळासाहेब चव्हाण यांनी बीजिंग ऑलिम्पिकमध्ये सहभाग नोंदवला होता. तर उमर पैलवान यांनी देशाच्या उत्तरेकडे अगदी आताच्या पाकिस्तानातील कराचीमध्ये कुस्त्या केल्या होत्या. तोच वारसा आता सातार्‍यातील पैलवान जिल्हा तालीम संघाच्या माध्यमातून जपत आहेत.

स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये उमर पैलवान यांनी देशाचा उत्तर भाग गाजवला. त्यानंतरच्या काळात अमृतराव पवार मास्तर हे देखील स्वातंत्र्यपूर्व काळातले पैलवान. 1952 साली हेलसिंकी येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे पै. खाशाबा जाधव यांनी वैयक्‍तिकमधील पहिले पदक पटकावले होते. या स्पर्धेत त्यांनी कॅनडा, मेक्सिको व जर्मनीच्या मल्‍लांवर लिलया मात केली होती. या स्पर्धेत त्यांनी कांस्य पदक पटकावून भारताला वैयक्‍तिकमधील पहिले ऑलिम्पिक पदक पटकावले. कुस्तीमध्ये सातार्‍याने आपली गौरवशाली पताका सर्वदूर फडकावली. सुपुत्र श्रीरंग (आप्पा) जाधव, खाशाबा जाधव व त्यानंतर 1962 च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये गेलेले बाबुराव चव्हाण (काशीद) हे मोठे मल्ल तयार झाले.सातारा शहरामध्ये त्याकाळी व्यायाम मंडळामध्ये पैलवान धोंडिराम शिंगरे, चंदर गिते, निवृत्ती ढोणे ही मंडळी सराव करत होती. त्यानंतर मारवाडी व्यायामशाळेमध्ये पैलवान बाबुराव चव्हाण, शिवाजीराव चव्हाण, साहेबराव पवार, किसनराव जाधव ही मंडळी सराव करत होती. त्याचबरोबर न्यू इंग्लिश स्कूल येथील भिडे गुरुजी व्यायामशाळेमध्ये ऑलिम्पिकवीर श्रीरंग आप्पा जाधव व खाशाबा जाधव हे सराव करत होते. यादरम्यान श्रीरंग आप्पा, धोंडिराम शिंगरे, साहेबराव पवार, निवृत्ती ढोणे, चंदर गिते यांची घट्ट मैत्री जमली.

स्वत:ची एक तालीम असावी यासाठी ही सर्व मंडळी आर. बी. जाधव (बापूसाहेब) यांना घेऊन तत्कालीन मंत्री बाळासाहेब देसाई यांच्याकडे गेले. देसाई यांनी या मंडळींना साडेतीन एकर जमीन व तालीम उभारण्यासाठी मोठा निधीही दिला. त्यानंतर 1962 मध्ये तालीम संघ, सातारा आणि जिल्हा तालीम संघ अशा दोन संस्था जन्माला आल्या.सातारा शहरामध्ये ग्रामीण भागातून येणार्‍या तरुण मुलांसाठी मल्लविद्येचे एक स्वतःचं तालीम मंडळ असावे म्हणून तालीम संघ निर्माण झाला आणि आज तोच तालीम संघ जिल्ह्याचा मानबिंदू झाला आहे. घट्ट मैत्री आणि एकजूट हे पाच जणांचे ब्रीद होते आणि याच्या जोरावर त्यांनी सातारा शहरामध्ये त्यांची स्वतःची वेगळी ओळख आणि दबदबा निर्माण केला. 60 वर्षांनंतरही ही संस्था सातारा शहरात अत्यंत दिमाखाने आणि सतत कार्यरत आहे. साहेबराव पवार (भाऊ) या तालीम संघाची देखभाल करत आहेत. चुकीच्या गोष्टी घडल्या तर माफ करणे व कोणी चुणूक दाखवत असेल तर त्याला ते प्रोत्साहन देतात. विशेष म्हणजे कुठल्याही प्रकारची फी अथवा पगार न घेता, कोणतेही शासकीय अनुदान न मिळता हा संघ पैलवानांसाठी कार्यरत आहे.

तब्बल 59 वर्षांनंतर दुसर्‍यांदा महाराष्ट्र केसरीची स्पर्धा आता सातार्‍यात होत आहे. या स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. पाच दिवस जिल्हा क्रीडा संकुलात पैलवानांचा 'शड्डू' घुमणार आहे. कुस्तीचा वारसा असणार्‍या सातार्‍यातील प्रेक्षकांना आता या स्पर्धेची आस लागून राहिली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news