कराड : पालिकेच्या मीटरप्रमाणे पाणी पुरवठ्याबाबत संभ्रम | पुढारी

कराड : पालिकेच्या मीटरप्रमाणे पाणी पुरवठ्याबाबत संभ्रम

कराड : प्रतिभा राजे
24 बाय 7 पाणीपुरवठा योजना गेल्या 13 वर्षापासून रखडली असताना कराड नगरपालिकेने दि. 1 एप्रिलपासून मीटरप्रमाणे पाणीपुरवठा सुरू केला आहे. टप्प्याटप्याने 24 बाय 7 पाणी पुरवठा योजना सुरू करण्यात येणार असल्याचे पालिकेने सांगितले असले तरी मीटरप्रमाणे लागू करण्यात आलेला दर अयोग्य असून 24 बाय 7 योजनेचे भूत कराडकरांच्या मानगुटीवर बसवून योजनेचा खर्च नागरिकांकडून काढण्यात येत असल्याच्या संतप्‍त भावना नागरिकांकडून व्यक्‍त होत आहेत. दरम्यान, सध्याच्या पाणीपुरवठयाबाबत नागरिकांमध्ये प्रचंड संभ्रम आहे.

दि. 1 एप्रिलपासून शहरातील सर्व पाण्याच्या टाकीचा झोनमधून नेहमीप्रमाणे परंतु मीटरप्रमाणे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. यासाठी घरगुती नळ कनेक्शनसाठी प्रती हजार लिटर पाण्यासाठी 8 रूपये दर (0 ते 10 हजार लिटरसाठी तर त्यापुढील पाणी वापरावर 8 ते 10 रूपये दर आकारण्यात आला आहे. तर संस्थांच्या नळ कनेक्शनासाठी 16 रूपये दर आकारणी तर व्यवसायिक नळ कनेक्शनसाठी 40 रूपये प्रती हजारी बिले आकारणी केली आहेत. लागू करण्यात आलेले दर सर्वसामान्य नागरिकांना परवडणारे नाहीत अशा प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्‍त केल्या आहेत.उदा. एखाद्या कुटुंबामध्ये 12 सदस्य असतील तर पिण्यासाठीचे पाणी, आंघोळ, कपडे, आदी खर्चाच्या पाण्यासहीत सुमारे 20 ते 25 हजार लिटर दर महिन्याला पाण्याचा वापर होणार आहे. तिमाही बिल भरावे लागणार असल्याने पाणीपट्टीपेक्षाही बिल जास्त द्यावे लागणार आहे. तर हॉटेल व्यावसायिकांना 40 रूपये प्रती हजार लिटर दर असल्याने व्यावसायिकांनाही हा दर परवडणारा नसल्याने दर कमी करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

इतर नगरपालिकांच्या 24 बाय 7 योजनेपेक्षा कराड शहरात दर जास्त का देण्यात येत आहे. याची माहिती नगरपालिकेने देणे गरजेचे असून 24 बाय 7 योजनेचा खर्च नागरिकांकडून वसूल करण्यापेक्षा इतर खर्च कमी करून पाणीपुरवठ्याचा खर्च पालिकेने भरावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

नगरपालिकेने याबाबतची माहिती द्यावी

मीटरप्रमाणे पाणी पुरवठा करण्यात येेेण्यापूर्वी याबाबतची माहिती नागरिकांना देणे पालिकेचे कर्तव्य होते. मात्र दरपत्रके नागरिकांच्या हातात दिली गेली. याबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे. नागरिक पूर्वीसारखेच पाण्याचा वारेमाप वापर करत आहेत. त्यामुळे मीटरप्रमाणे पहिले येणारे बिल भरमसाठ असणार आहे. त्यावेळी नागरिकांमधून संताप व्यक्‍त होणार असल्याने पालिकेने तत्पूर्वी याची पूर्ण माहिती द्यावी, अशा मागणी नागरिकांकडून होत आहे.

नगरपालिका प्रशासनाने आजूबाजूच्या नगरपालिका काय दराने पाणीपट्टी आकरतात याचा अभ्यास करावा. नगर परिषदेने शेजारच्या नगरपालिकांपेक्षा दुप्पट दराने पाणीपट्टी आकारली असून या अन्याया विरोधात मी कराड नगर परिषदेच्या दारात आमरण उपोषणास बसणार आहे.
– संजय चव्हाण
सामाजिक कार्यकर्ते

24 बाय 7 योजनेचा खर्च पालिका नागरिकांकडून घेत आहे. लोकप्रतिनिधी याबाबत गप्प आहेत. प्रशासनाच्या हातात कारभार गेल्यामुळे हा प्रकार होत असून मनसे याबाबत आक्रमक पवित्रा घेणार आहे. योजनेत बराच गोलमाल झाला असून त्याचा भार नागरिकांवर देत आहेत.
– सागर बर्गे
शहराध्यक्ष, मनसे

Back to top button