Khashaba D. Jadhav : खाशाबा जाधव ऑलिम्पिकमध्‍ये सहभागी व्‍हावेत यासाठी ‘या’ प्राचार्यांनी बंगला ठेवला हाेता गहाण

Khashaba D. Jadhav : खाशाबा जाधव ऑलिम्पिकमध्‍ये सहभागी व्‍हावेत यासाठी ‘या’ प्राचार्यांनी बंगला ठेवला हाेता गहाण

पुढारी ऑनलाईन डेस्क : कुस्ती म्हटलं की, ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव ( Khashaba D. Jadhav ) याचं स्‍मरण हाेतेच. ऑलिम्पिक स्पर्धेत देशाला पहिले वैयक्तिक पदक जिंकून देणार्‍या खाशाबा जाधव यांची आज जयंती. तुम्हाला माहित आहे का? खाशाबा जाधव यांना ऑलिम्पिक स्पर्धेला जाण्यासाठी कोल्हापूरच्या शहाजी कॉलेजचे तात्‍कालीन प्राचार्य दाभोळकर यांनी आपला बंगला गहाण ठेवून पैसे दिले होते. पाहूया, काय आहे हा किस्सा ?

Khashaba D. Jadhav घरातचं कुस्तीचे बाळकडू 

खाशाबा यांना एकूण ७ भावंडे. त्‍यांच्‍या आजोबांना कुस्तीचं वेड होतं. खाशाबांचे वडील  दादासाहेबही त्या परिसरातील ख्यातनाम असे पैलवान होते. खाशांबांच्या घरची परिस्‍थिती बेताची.  त्यांना वडिलांकडून कुस्तीचे बाळकडू मिळाले. वडील दादासाहेब त्यांना घरातचं कुस्तीचे शिक्षण देवू लागले.  मुलतानी डावावर चीत करणारा पहिलवान अशी खाशाबांची ख्याती आजूबाजूच्या परिसरात झाली होती. खाशाबा फक्त कुस्तीतचं पारंगत नव्हते तर मल्लखांब, हातोडीफेक, वेटलिफ्टींग मध्येही त्यांचा हातखंडा होता. त्‍यांनी वयाच्या आठव्या वर्षी  गोळेश्वरजवळील रेठरे गावच्या जत्रेत सर्वप्रथम कुस्ती जिंकली. त्यांना बक्षीस म्हणून चक्क साखरेच्या बदामाचा खाऊ दिला होता. त्यानंतर टिळक हायस्कूलमध्ये त्यांना कुस्तीचे शास्त्रशुध्द  प्रशिक्षण क्रिडाशिक्षक गुंडोपंत बेलापुरे व मुख्याध्यापक बाबूराव वळवडे यांनी दिले.

ऑलिम्पिक स्पर्धेचा प्रवास

मॅट्रिकनंतर त्यांना कुस्तीपंढरी असलेल्या कोल्हापूरचे वेध लागले. वडिलांनी आपली शेतजमीन गहाण ठेवून खाशाबांना राजर्षी शाहू महाराजांच्या कुस्तीपंढरीत पाठवले. त्‍यांनी राजाराम महाविद्यालयात  प्रवेश घेतला.  मराठा  बोर्डींंगमध्ये राहायला गेले आणि आणि सुरू झाला ऑलिंपिक स्पर्धेचा प्रवास. या प्रवासात त्यांना क्रीडा शिक्षक गोविंद पुरंदरे यांच मोलाचे मार्गदर्शन लाभले.

१९४८ लंडन ऑलिम्पिक

लंडनमधील १९४८ मध्‍ये हाेणार्‍या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी खाशाबा यांची  निवड झाली. आर्थिक टंचाई होती. तरीही पैशांची जमवा-जमव केली. पैशाची अडचण दूर झाली; पण स्पर्धेच्या काही दिवस त्यांना समजले की, मॅटवरील कुस्ती खेळायची आहे. तर सराव लाल मातीत सुरु हाेता. तरीही नाउमेद न होता त्‍यांनी सराव सुरु ठेवला.  ऑलिंपिक स्पर्धेसाठी जिंकण्याची उमेद घेवून  लंडनला गेलेल्या खाशाबा (Khashaba D. Jadhav) त्यांच्या पदरी पहिल्‍या प्रयत्‍नात अपयश आले.

हेलसिंकी ऑलिम्पिक १९५२

१९५२ मध्ये फिनलॅंड देशातील हेलसिंकी येथे हाेणार्‍या  ऑलिंपिक स्पर्धेसाठी अनेक अडचणीनंतर त्यांची निवड झाली. गेल्या  ऑलिम्पिक स्पर्धेसारखीच  आर्थिक अडचणी कायम हाेती.  सराव सांभाळत खशाबा पै-पै करून 'थेंबे थेंबे तळे साचे' या उक्तीप्रमाणे  एक-एक रूपयापासून  पैशांची जमवाजमव करू लागले. त्यांना विविध वर्गातून, लोकवर्गणीतून मदत होवू लागली. घरच्या लोकांनी घरबांधणीसाठी साठवलेली पुंजीही दिली.

ऑलिंपिक स्पर्धेत कुस्ती या खेळातून कास्य पदक जिंकून स्वतंत्र भारतातील पहिले वैयक्तिक पदक खाशाबा जाधव यांनी जिंकून दिले.
ऑलिंपिक स्पर्धेत कुस्ती या खेळातून कास्य पदक जिंकून स्वतंत्र भारतातील पहिले वैयक्तिक पदक खाशाबा जाधव यांनी जिंकून दिले.

प्राचार्यांनी गहाण ठेवला बंगला

छत्रपती शहाजी महाराज, कोल्हापूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी अरविंद बाम, राजाराम महाविद्यालयाचे प्राचार्य गोकांक यांनीही आर्थिक मदत केली. साधारणपणे १२,००० रूपये खर्च येणार होता.  पैशांच्या जमवा-जमव करण्‍यासाठी त्यांची पळापळ सूरू होती. ही धावपळ प्राचार्य दाभोळकर जवळून पाहत होते. लोकवर्गणी कमी पडत आहे हे लक्षात येताच त्यांनी आपला बंगला गहाण ठेवून  पैशांची मदत केली. खाशाबांचे शिक्षक वळवडे यांनी आपल्या विद्यार्थी प्रेमापोटी आपला तीन महिन्यांचा पगार खशाबा यांना दिला. दिला. टिळक हायस्कूल मधून माजी विद्यार्थ्यांनीही मदत केली, अशी माहिती संजय दुधाणे लिखित ऑलिम्‍पिकवीर खाशाबा जाधव पुस्‍तकात देण्‍यात आली आहे.

२३ जुलै १९५२  देशासाठी ठरला सुर्वण दिन

हेलसिंकी ऑलिम्पिक स्पर्धेसाठी  फ्री स्टाईल बॉटमवेट (५७ किलो) या गटासाठी खाशाबा यांची निवड झाली होती. या गटात एकूण २४ स्पर्धक होते. २३ जुलै १९५२ दिवस उजाडला. खाशाबा संघाचे व्यवस्थापक प्रतापचंद दिवाण यांच्याकडे गेले आजच्या स्पर्धा किती वाजता विचारण्‍यासाठी. त्यांनी आज सुट्टीचा दिवस आहे, असे सांगून शाखाबा यांना विश्रांती घ्यायला सांगितले. खाशाबा विश्रांती घेवून पुन्हा कुस्ती सभागृहात इतर कुस्त्या पाहायला गेले. अचानक त्यांच्या नावाची घोषणा झाली; पण गडबडून न जाता ते स्पर्धेत उतरले.  खाशाबा जाधव यांनी कास्य पदकावर आपली माेहर उमटवत इतिहास घडवला.

पाहा व्हिडिओ : कुस्तीची परंपरा जोपासतायत नव्या दमाचे मल्ल | wrestling story

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news