भुईंजचे सायकलवेडे निघाले पंढरीला

भुईंजचे सायकलवेडे निघाले पंढरीला

भुईंज : पुढारी वृत्तसेवा 'वारी पंढरीची, सेवा वसुंधरे'ची हा कृतीशील संदेश घेवून भुईंज येथील सायकल वेडे ग्रुपचे सदस्य शनिवार दि. 2 जुलै रोजी सायकलवरुन भुईंज ते पंढरपूर अशा अनोख्या सायकल वारीसाठी सज्ज झाले आहेत. सायकल वापराबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने महाराष्ट्राच्या विविध भागातून सायकलस्वार पंढरीच्या दिशेने येणार आहेत.

या सायकलवारीत भुईंज येथूनही सायकल स्वार सहभागी होत आहेत. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर सायकल वारीत सायकल वेडे ग्रुपचे अध्यक्ष संतोष ननावरे, सागर दळवी, सुनील शेवते, योगेश शिर्के, अवी नवले, गौरव जाधव, अजिंक्य पिसाळ, निलेश दगडे, सिद्धार्थ भंडारे, सोहम ननावरे, हर्ष शेवते यांच्यासह उत्कर्ष दळवी, विवेक दळवी हे चिमुरडे सायकलस्वार सहभागी होत आहेत.

पंढरपूर येथे होणार्‍या नगरप्रदक्षिणा रिंगण सोहळ्यात महाराष्ट्रातून येणार्‍या 250 हून अधिक सायकल दिंड्या सहभागी होणार असून यामध्ये भुईंज येथील सायकल वेडे ग्रुपला क्र. 7 चे स्थान मिळाले आहे. या आगळ्या वेगळ्या मोहिमेचे परिसरात कौतुक होत आहे. या मोहिमेद्वारे पर्यावरण संवर्धन करण्याच्या प्रयत्नाला प्रियदर्शिनी गर्ल्स हायस्कूलने मोलाचा हातभार लावला आहे. या विद्यालयाच्या विद्यार्थीनींनी सुमारे 500 सीड बॉल तयार करुन सायकलवेडे ग्रुपचे सागर दळवी यांच्याकडे सुपूर्द केले असून ते जाताना वाटेत ठिकठिकाणी रुजवत ही सायकलवारी पुढे जाणार आहे. या उपक्रमाबद्दल प्राचार्या सौ. संगिता शिंदे, शुभदा महाबळेश्वरकर, मंगल फरांदे, सर्व शिक्षिका व विद्यार्थींनींचे कौतुक होत आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news