

प्रतापगड : अभय हवालदार
महाबळेश्वरची पावसाचे आगार म्हणून ओळख आहे. दरवर्षीच येथे अतिवृष्टी होते. देशात सर्वाधिक पाऊस असणाऱ्या या ठिकाणी दरवर्षी पावसामुळे रस्ते, पुलांची दुरवस्था होते. मात्र, या तालुक्यातील पार या गावात असा एक पूल आहे, जो छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला आहे. या पुलाला तब्बल ३५० वर्षे होऊनही हा पूल अजूनही अभेद्य आहे. पाऊस व वादळवाऱ्यातही डौलाने उभा राहिला आहे. त्यामुळे या पुलासाठी वापरलेल्या तंत्रज्ञानाची आजही वाहवा केली जाते.
शिवकालीन पूल म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकाळात बांधलेले पूल. हे पूल प्रामुख्याने मराठा साम्राज्याच्या विकासासाठी आणि प्रवासासाठी बांधले गेले. या पुलांची रचना, उपयोगिता आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. तेसुद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाचे साक्षीदार आहेत. याप्रमाणेच शिवरायांच्या कारकिर्दीत बांधण्यात आलेला पारचा हा पूलदेखील कुतूहलाचा विषय आहे. या पुलाचे बांधकाम मजबूत आहे. त्याची रचना पाहून भले भले इंजिनिअरही चाट पडतात.
या पुलाला पाच दगडी खांब आणि चार कमानी आहेत. पुलाचा प्रत्येक दगड काटकोनात घडवलेला आहे. प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या पार गावात हा पूल आहे. महाबळेश्वरच्या डोंगरातून उगम पावणारी कोयना नदी पावसाळ्यात रौद्ररुप धारण करते. अशा स्थितीत पर्यायी वाहतूक व्यवस्था असावी, यासाठी महाराजांनी हा पूल बांधला. सातारा जिल्ह्यात कोयना नदीवर हा शिवकालीन पूल उभा आहे. ३५० वर्षे जुन्या या पुलाला आजपर्यंत एकही तडा गेलेला नाही. आजपर्यंत या पुलाचं कधीही पुनर्वांधकाम किंवा डागडुजीही केली गेलेली नसल्याचं इतिहासतज्ज्ञ सांगतात. २०२२ च्या अतिवृष्टीमध्ये देखील कुठल्याही प्रकारची इजा या पुलाला झालेली नाही. आजदेखील हा पूल 'जैसे थे' आहे.
शिवरायांच्या काळात बांधलेल्या या पुलाचा उपयोग नंतर कोकणात जाण्यासाठी होऊ लागला. कोकणातील सर्व दळणवळणाची कामं याच पुलावरून होऊ लागली.
हा पूल ५२ मीटर लांब तर ८ मीटर रुंद आहे. विशेष बाब म्हणजे फक्त चुन्याचा वापर करून या पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे. या पुलाचे खास वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक खांबाला धारदार कु-हाडीसारख्या दगडी भिंती आहेत.