

सातारा : ‘पुढारी एज्यु दिशा’ प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी आता करिअरच्या संधीचा खजिना आजपासून खुला होत आहे. शुक्रवार दि. 30, 31 मे ते 1 जून या कालावधीत सातार्यातील पोलिस करमणूक केंद्रात होत असलेल्या या प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या प्रदर्शनात शैक्षणिक क्षेत्रातील करिअरच्यादृष्टीने बहुविध माहिती, तज्ञांचे मार्गदर्शन विद्यार्थी व पालकांना मिळणार असून त्याद्वारे विद्यार्थ्यांना शैक्षणिक वाटांचा नवीन खजिना उपलब्ध होणार आहे.
दहावी, बारावी या महत्वाच्या परीक्षांचा टप्पा पूर्ण केल्यानंतर पुढे काय करायचे? याबद्दल अभ्यासक्रमांची रेलचेल सध्या समोर दिसते. पालक आणि विद्यार्थी याबाबत संभ्रमावस्थेत असतात. मात्र, या अभ्यासक्रमांची सर्वंकष माहिती तसेच नेमके आणि अचूक करिअर निवडीचे मार्गदर्शन आता सहजपणे येथे उपलब्ध होणार आहे. अनेक शैक्षणिक संस्थांचे स्टॉलही असणार आहेत. येथे विविध शैक्षणिक पर्यायांची माहिती उपलब्ध असेल.
दैनिक ‘पुढारी’च्या ‘एज्यु दिशा’ करिअर प्रदर्शनाला दरवर्षी विद्यार्थी व पालकांचा उदंड प्रतिसाद लाभत आला आहे. त्याच धर्तीवर आता आजपासून ‘पुढारी एज्यु दिशा’ प्रदर्शन सुरू होत आहे. यामध्ये तज्ञ मंडळींकडून मार्गदर्शन लाभणार आहे. त्यामुळे विद्यार्थी तसेच पालकांच्याही मनात असणार्या अनेक शकांचे निरसन तीन दिवस चालणार्या प्रदर्शनातून होणार आहे. प्रदर्शनाने करिअरच्या हजारो वाटा विद्यार्थी-पालकांसाठी खुल्या होणार आहेत.
येथील पोलिस करमणूक केंद्रात सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी संजय घोडावत युनिव्हर्सिटीचे मॅनेजमेंट ट्रस्टी विनायक भोसले, संजय घोडावत युनिव्हर्सिटीचे कुलगुरु प्रा. डॉ. उध्दव भोसले, विश्वकर्मा युनिव्हर्सिटीचे प्रा. राहुल मते, भारती विद्यापीठ यशवंतराव मोहिते इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट कराडचे उपप्राचार्य डॉ. विशाल देशमुख, एमआयटी विश्वप्रयाग युनिव्हर्सिटी सोलापूरचे डीजीटल मार्केटिंग मॅनेजर अमित जाधव,चाटे शिक्षण समूह सातारा जिल्हा प्रमुख राजेंद्र घुले, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे प्रा. शीतल भुसारे, स्कूल ऑफ इंजिनिअरिंग पीसीईटीज् पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटीचे हेड डॉ. व्ही. एन. पाटील, एमआयटीएडीटी युनिव्हर्सिटीचे प्रा. अमित उत्तरकर यांच्या उपस्थितीत प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे.
त्यानंतर दुपारी 12 ते 1 या वेळेत ‘यशस्वी करिअरसाठी तांत्रिक शिक्षणाचे फायदे’ या विषयावर स्कूल ऑफ इंजिनिअरिंग पीसीईटीज पिंपरी चिंचवड युनिर्व्हसिटीचे डॉ. व्ही. एन. पाटील यांचे व्याख्यान होणार आहे. तसेच सायं. 5 ते 6 या वेळेत ‘व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेताना महाविद्यालय कसे निवडावे, केंद्रभूत प्रवेश प्रक्रियेस सामोरे जाताना व व्यवस्थापन क्षेत्रातील प्रवेश प्रक्रिया आणि करिअर संधी’ या विषयावर यशोदा टेक्निकल कॅम्पसचे सहसंचालक प्रा. रणधिरसिंह मोहिते यांचे व्याख्यान होणार आहे.
शनिवार, दि. 31 मे रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत ‘सर्व शैक्षणिक विद्या शाखांसाठी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय)’ या विषयावर विश्वप्रयाग युनिर्व्हसिटी सोलापूरचे प्रा. राहुल दामजी यांचे व्याख्यान होणार आहे. सायंकाळी 5 ते 6 वेळेत ‘फार्मसी- उज्ज्वल करिअर संधी असलेले एक व्यावसायिक क्षेत्र’ या विषयावर विश्वकर्मा विद्यापीठ पुणेचे प्रा. विपुल परब यांचे व्याख्यान होणार आहे. रविवार, दि. 1 जून रोजी या प्रदर्शनाचा समारोप होणार असून सकाळी 11 ते 12 या वेळेत ‘चार्टड अकौटंट (सीए) क्षेत्रातील करिअरच्या संधी’ या विषयावर सातारा ब्रँच ऑफ दि डब्ल्यू आय आर सी ऑफ आयसीएआयचे सदस्य सीए हर्षवर्धन जाधव यांचे व्याख्यान होणार आहे.
नामांकित संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित.
कोर्स निवड, अॅडमिशन प्रक्रिया, स्कॉलरशिप यावर थेट मार्गदर्शन.
विद्यार्थी आणि पालकांसाठी विशेष समुपदेशन.
योग्य करिअर निवडीत निर्णायक ठरणारी मार्गदर्शनपर व्याख्याने.
विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन त्या क्षेत्रातील अनुभवी व्याख्यात्यांकडून.