

दहिवडी : दहिवडी येथील किराणा दुकान फोडून रोकड लंपास केलेल्या चोरट्यांना दहिवडी पोलिसांनी 24 तासांच्या आत जेरबंद केले. त्यांच्याकडून रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.
अभिजित कालिदास पवार (वय 26 ), आदित्य कालिदास पवार (वय 19, दोघे रा. वेटणे ता. खटाव) अशी संशयितांची नावे आहेत. दहिवडी येथील किराणाचे दुकान फोडून चोरट्यांनी सुमारे 82 हजार 500 रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना दि. 24 मे रोजी मध्यरात्री घडली होती. या घटनेची पोलिस ठाण्यात नोंद होताच दहिवडी पोलिसांनी तपासाची चक्रे गतीमान केली होती. 24 तासाच्या आत दोघा संशयितांना पोलिसांनी अटक केली.
सपोनि दत्तात्रय दराडे, पोलिस उपनिरीक्षक गुलाब दोलताडे, पोलिस हवालदार वावरे, बापू खांडेकर, पोलिस नाईक नितीन धुमाळ, महीला पोलिस नाईक रासकर, पोलिस कॉन्स्टेबल निलेश कुदळे, महेंद्र खाडे, गणेश खाडे यांनी संशयितांना पुसेगाव परिसरातून अटक केली. चोरट्यांनी लंपास केलेल्या रक्कमेपैकी 22 हजार 500 रुपये रोकड पोलिसांनी हस्तगत केली. दोन्ही संशयितांवर सातारा, वडूज, पुसेगाव या पोलिस ठाण्यात यापूर्वी अनेक गुन्हे दाखल आहेत.