

सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील सुमारे 47 शिक्षिकांनी इच्छित शाळेत बदली होण्यासाठी घटस्फोटाचे प्रमाणपत्र सादर केले आहे. शिक्षकांच्या बदली प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर घटस्फोटितांची नोंद सेवा पुस्तकात करण्याबाबत प्राथमिक शिक्षण विभागाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे शिक्षकांचे धाबे दणाणले आहेत.
प्रशासकीय, विनंती व आपसी बदल्यांमधून सूट मिळावी या उद्देशाने जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांकडून अनेक गैरमार्गांचा अवलंब होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग सतर्क झाला असून दिव्यांग, गंभीर आजारग्रस्त शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वैद्यकीय मंडळाकडून पडताळणी करण्यात येणार आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे 467 दिव्यांग, आजारग्रस्त तसेच 47 घटस्फोटित शिक्षक प्रशासनाच्या रडारवर आले आहेत. घटस्फोटित शिक्षकांना आता जिल्हा परिषद प्रशासनाने दणका दिला असून त्यांची नोंद सेवापुस्तकावर घेण्यात येणार आहे.
प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांवरुन दरवर्षी वादंग निर्माण होत असताना यावर्षी तर शिक्षकांकडून अनेक गैरमार्गांचा अवलंब झाल्याचा आरोप होत आहे. अनेक शिक्षकांनी बदल्या वाचवण्यासाठी घटस्फोट, दिव्यांग प्रमाणपत्र, आजारी असल्याचे प्रमाणपत्र घेवून प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबत जिल्हा परिषद प्रशासनाकडे तक्रारी येवू लागल्याने समिती गठीत करण्यात आली. त्याचबरोबर तालुकास्तरावर दिव्यांग व आजारग्रस्त प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात येत आहे.
प्राथमिक शिक्षकांनी बदल्यांमधून सुट मिळावी म्हणून अनेक फंडे वापरण्यास सुरुवात केली असून दिव्यांग प्रमाणपत्र, घटस्फोट, आजारग्रस्त असल्याचे सर्टिफिकेट आदी मुद्यांवरुन या बदल्या गाजणार आहेत. जिल्ह्यातील 47 प्राथमिक शिक्षकांनी घटस्फोट घेतल्याच्या प्रकारात आणखी भर पडली आहे. प्रत्यक्षात तशी परिस्थिती असेल असे वाटत नाही. मात्र, बदल्यांसाठी काहीही या धोरणाप्रमाणे शिक्षक आपल्या हुशारीचा उपयोग करुन घेत आहेत. याबाबत तक्रारी आल्यानंतर धोरणात्मक निर्णय घेवून चुकीच्या मार्गाचा अवलंब करणार्या शिक्षकांना धक्का दिला आहे. आता घटस्फोटित शिक्षकांची त्यांच्या सेवापुस्तकावर नोंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.