जनतेच्या अस्मितेवर घाला घालण्याचा प्रयत्न हाणून पाडू : खासदार उदयनराजे भोसले यांचा इशारा

जनतेच्या अस्मितेवर घाला घालण्याचा प्रयत्न हाणून पाडू : खासदार उदयनराजे भोसले यांचा इशारा
Published on
Updated on

सातारा; पुढारी वृत्तसेवा : "शिवप्रभुंचा सातरस्ता पोवईनाका येथे असलेले पूर्णाकृती पुतळारुपी शिवस्मारक सर्वांचे प्रेरणास्थान आहे. हे प्रेरणास्थान कायम शिवस्मारक म्हणूनच राहणे आवश्यक आहे. शिवप्रभुंपेक्षा दिग्गज किर्तीचे कोणी होईल किंवा कोणी असेल असे वाटत नाही. याठिकाणी अन्य कोणाच्या नावाने काही करण्याचे कोणीही धाडस करु नये. अधिकार गाजवून, जनतेच्या अस्मितेवर घाला घालण्याचा कोणी हिन प्रकार करत असेल तर तो जनतेच्या माध्यमातून हाणून पाडला जाईल, अला इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला आहे. फेसबूक पोस्ट करून त्यांनी हा इशारा दिला आहे.

उदयनराजे भोसले यांनी फेसबूक पोस्टमध्ये लिहीले की, "सातरस्ता म्हणून ओळखला जाणारा पोवईनाका परिसर हे सातारा शहराचे नाक आहे. याठिकाणी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळयाचे स्मारक आहे. या स्मारकाचे सध्या सर्वांच्या सहकार्याने आणि नगरपरिषदेच्या माध्यमातुन चांगले सुशोभिकरण होत आहे. सातारकरांनाच नव्हे तर येथून जाणा-या-येणा-या सर्वांनाच हा शिवस्मारक परिसर प्रेरणा देणारा आहे. या प्रेरणास्थानाच्या ठिकाणी अन्य काही महापुरुषांचे स्मारक किंवा आईसलॅन्ड करण्याचे कोणी घाट घालत असेल तर जनतेच्या अस्मितेवर तो घाला असेल. स्वराज्याचे शिल्पकार शिवप्रभुंचे कर्तुत्व झाकाळले जाईल. असे काही कोणी करण्याचा प्रयत्न जरी केला तर ते प्रयत्न हाणून पाडले जातील. लोककल्याणकारी शिवप्रभुंची तुलना अन्य कोणाशी होवू शकणार नाही आणि तसा प्रयत्न देखील कोणी करु नये अशी माफक अपेक्षा आहे," असे उदयनराजे यांनी म्हटले आहे.

"राजघराण्याचे जेष्ठ व्यक्तीमत्व राजमाता श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले यांनी आज शिवस्मारक परिसराची पाहणी केली आहे. या ठिकाणी अन्य काही नको, अशी प्रामाणिक भावना आणि सर्वसामान्य सातारकरांच्या मनातील भूमिका त्यांनी येथे प्रथमदर्शनी मांडली आहे. तसेच या शिवस्मारक परिसरालगत छत्रपती संभाजी महाराज आणि शाहुनगरीचे संस्थापक, ज्यांच्या नेतृत्वाखाली मराठा साम्राज्याचा आटकेपार झेंडा फडकविण्यात आला त्या श्रीमंत छत्रपती शाहू महाराज या दोन एैतिहासीक व्यक्तीमत्वांची शानदार स्मारके उभारण्याची संकल्पना आहे. आमचा कोणाला विरोध नाही. परंतु या संकल्पित स्मारकांना आणि शिवस्मारकास अडचणीच ठरेल असे कोणतेही कृत्य शिवस्मारक भुमीमध्ये होऊ दिले जाणार नाही," असे माजी नगराध्यक्ष रंजना रावत यांनी म्हटले आहे.

"जिल्हापरिषदेच्या मालकीच्या शिवस्मारक परिसराचे पावित्र्य जतन करण्याचे आणि ते उत्तरोत्तर वर्धिष्णू करण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. सर्व लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी ही जबाबदारी निश्चितपणे पार पाडतील, अशी अपेक्षा आहे. त्यातुनही शिवप्रभुंच्या स्मारकरुपी पराक्रमाचा अवमान होईल असे कोणतेही कृत्य कोणीही करण्याचा प्रयत्न केला तर सर्व सातारकर एक होवून, हा कुटील प्रयत्न उलथवून लावतील," असा विश्वासही रावत यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news