महाबळेश्वर/पाचगणी : पुढारी वृत्तसेवा
सलग सुट्ट्यांमुळे महाबळेश्वर – पाचगणीला पर्यटकांची रिघ लागली आहे. गुरुवारपासूनच पर्यटक मोठ्या संख्येने या पर्यटनस्थळी दाखल झाले आहेत. शनिवारी तर हा ओघ आणखी वाढला. त्यामुळे महाबळेश्वरमध्ये वाहतूक कोंडीही झाली. पर्यटक विविध पॉईंटवर हजेरी लावत असून निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटत आहेत.
गुरुवार, दि. 14 पासूनच सुट्टीचा माहोल सुरु झाला असून पर्यटनस्थळांवरील ताण वाढला आहे. सलग सुट्ट्यांमुळे पर्यटक जागतिक पर्यटनस्थळ असलेल्या महाबळेश्वर व पाचगणी येथे पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी दाखल झाले आहेत. त्यामुळे महाबळेश्वरमध्ये अनेकदा वाहतूक कोंडी झाली. पर्यटकांसह स्थानिक नागरिकांनाही त्याचा मोठा त्रास झाला. पर्यटक विविध पॉईंटला भेट देत असून घोडेसवारीचाही आनंद घेत आहेत. प्रत्येकजण जिभेचे चोचले पुरवण्याकडे लक्ष देत आहे.
पाचगणीतही उन्हाळी पर्यटनास बहर आला आहे. उन्हाळ्याच्या दिवसातही पर्यटक रात्रीच्यावेळी थंडीचा सुखद अनुभव घेत आहेत. कोरोनामुळे गेली दोन वर्षे पर्यटकांनी पाचगणीकडे पाठ फिरवली होती. त्यामुळे येथील व्यवसायही ठप्प झाला होता. सलग सुट्ट्यांमुळे पर्यटनाचा बहर पुन्हा मार्गी लागला आहे. लहान मुले, अबालवृद्ध, युवक पर्यटक आपल्या दुचाकी, चारचाकी वाहनातून पाचगणीत येत आहेत. त्यामुळे येथील टेबललँडवर घोडेसवारी करताना, टायगर गुहेत, पारशी पॉईंट, सिडने पॉईंट येथे पर्यटकांची गर्दी दिसून येत आहे. टेबल लँड व पारशी पॉईंटवरून धोम जलाशयाचे विहंगम दृश्य पाहत येथील प्रसिद्ध स्ट्रॉबेरी, राजबेरी, गावरान मेवा, चने तसेच आईस्क्रीम खात आनंद घेत आहेत. पाचगणी प्रवेशद्वाराजवळ दांडेघर नाका येथे व पारशी पॉईंट येथे उभारण्यात आलेल्या सेल्फी पॉईंटवर फोटो काढण्याचा आनंद घेतला जात आहे.