सोलापूर : कामावरून घरी जाताना मनपाच्या मजुराचा मृत्यू | पुढारी

सोलापूर : कामावरून घरी जाताना मनपाच्या मजुराचा मृत्यू

सोलापूर ; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या विभागीय कार्यालय क्र. 5 मध्ये मजूर म्हणून काम करणार्‍या विष्णू सुरवसे या मजुराचा शनिवारी आकस्मिक मृत्यू झाला. दरम्यान, त्या कामगाराचा मृतदेह असलेली शववाहिका कामगार संघटनांनी महापालिका आयुक्तांच्या घरासमोर आणली. तेथे कामगार संघटना आणि विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आयुक्तांची भेट घेऊन संबंधित मृताच्या वारसाला अनुकंपा तत्त्वावर महापालिकेच्या सेवेत घेण्याची मागणी केली.

सुरवसे हे शनिवारी सकाळी कामावर होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीनिमित्त विविध वस्तूंच्या खरेदीसाठी ते दुपारी अर्धी रजा घेऊन कामावरून निघाले होते. वाटेत त्यांचे आकस्मिक निधन झाले. उष्माघातामुळे चक्कर येऊन मृत्यू झाल्याचे कामगार संघटनांचे म्हणणे आहे.

या घटनेनंतर मनपा कामगार संघटना कृती समितीचे चांगदेव सोनवणे, उमेश गायकवाड, जनार्दन शिंदे तसेच बहुजन समाज पक्षाचे बबलू गायकवाड, देवा उघडे, अ‍ॅड. संजीव सदाफुले आदींनी सुरवसे यांचा मृतदेह असलेली शववाहिका मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांच्या घरासमोर आणली. तेथे त्यांनी आयुक्तांची भेट घेऊन मृताच्या पत्नीस अनुकंपा तत्वावर मनपात नोकरी देण्याची मागणी केली. यावर आयुक्तांनी तूर्त आऊटसोर्सिंग तत्वावर कामावर घेण्याचे आश्वासन दिल्याचे देवा उघडे यांनी सांगितले.

नुकसानभरपाईचीही मागणी

कामगार संघटना कृती समितीचे अध्यक्ष अशोक जानराव यांनी सांगितले की, शहरात उन्हाचे प्रमाण प्रचंड वाढल्याने सफाई कामगार, बिगारी, मजूर यांना कामास सवलत देण्याची मागणी यापूर्वी आयुक्तांकडे केली आहे. केवळ कायद्याच्या नव्हे तर माणुसकीच्या द़ृष्टीने कामगारांना कामात सवलत देण्याची गरज आहे. सुरवसे यांचा कामावर असताना मृत्यू झाल्याने त्यांच्या वारसास अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याबरोबरच नुकसानभरपाई देण्यात यावी. दरम्यान, सुरवसे यांचा मृत्यू नेमके कशाने झाला, याची उकल शवविच्छेदन अहवालात स्पष्ट होणार आहे.

Back to top button