उंडाळे; वैभव पाटील : कोरोनाच्या तिसर्या लाटेच्या शक्यतेने पैलवान आणि कुस्ती क्षेत्र अडचणीत आले आहे. स्थानिक यात्रांमध्ये कुस्ती मैदानांचे आयोजन केले जाते. स्थानिक प्रशासनाच्या परवानगी न देण्याच्या धोरणाने पुन्हा कुस्ती थांबली आहे. ही कुस्ती कोरोनाचे नियम पाळून पुन्हा सुरू ठेवावी, अशी मागणी कुस्ती शौकिनांनी केली आहे.
मार्च २०२० पासून कोरोनामुळे कुस्ती क्षेत्राला आर्थिक अवकळा आली होती. कुस्तीची मैदाने नसल्याने पैलवानांची आर्थिक बाजू फारच खालावलेली होती. आर्थिक संकटामुळे सर्व पैलवान आपआपल्या गावी राहूनच कुस्तीची सर्व मेहनत करीत होते. दोन वर्षानंतर आत्ता कुठे गावोगावच्या यात्रा मैदानात कुस्तीचे मैदान फड भरायला लागले होते. त्यामुळे पुन्हा पैलवानांचे शड्डू यात्रांमधून घुमू लागले होते.
या कुस्ती मैदानांमुळे पैलवानांना त्यांच्या मेहनतीची बिदागी म्हणून चार रुपये हातात मिळत होते. त्यामुळे पैलवानांची खाण्यापिण्याची तरी सोय होती. पण सध्या कुस्ती मैदान असल्यामुळे आर्थिक परिस्थितीने अनेक पैलवानांना इच्छा असूनही खुराक मिळत नाही. त्यातच दोन वर्षानंतर कोरोना संसर्ग कमी झाल्याने पुन्हा कुस्ती मैदाने सुरू होतील आणि पैलवानांना पुन्हा चांगले दिवस येतील, अशी अपेक्षा असतानाच तिसर्या लाटेच्या शक्यतेने प्रशासनाने यात्रा तसेच कुस्ती मैदानावर बंदी आणली आहे. ही बंदी प्रशासनाने कोरोनाचे नियम पाळून सुरू करावी, अशी मागणी कुस्ती शौकीन करत आहे.
आता पुन्हा कोरोनाचे सावट गडद होऊ लागल्याने कुस्ती मैदानांना परवानगी मिळणे अवघड झाले आहे. कराड तालुक्यात अशीच परिस्थिती असून पोलीस प्रशासनाने कायदा व नियम यांची सांगड घालून कुस्ती मैदान परवानगी दिल्यास पैलवानांचे कुठेतरी भले होईल. स्थानिक प्रशासन यात्रेची परवानगी देत नाहीत. त्यामुळे गावोगावच्या यात्रा रद्द होत आहेत. पुढील आठवड्यात होणारी कुस्ती मैदाने रद्द करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.
त्यामुळेच नियमांचे पालन करत गावोगावी कुस्ती मैदाने भरवण्यास सशर्त परवानगी मिळाल्यास पैलवानांना तसेच कुस्ती शैकिनांना फायदा होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच कुस्ती मैदानांना सशर्त परवानगी देण्यास काय अडचण आहे ? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. तरी प्रशासनाने कुस्तीला सशर्त परवानगी द्यावी, अशी मागणी होत आहे.
कोरोनामुळे प्रशासन कुस्ती मैदानांना परवानगी नाकारत आहे. प्रशासनाने सशर्त परवानगी देत कुस्ती मैदाने झाल्यास कुस्ती व पैलवान टिकण्यास मदत होणार आहे. कोरोनाचे नियम पाळण्यास सर्वजण तयार असल्याने याचा गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे.
कुस्ती संघटक तानाजी चवरे
हेही वाचलंत का?