जळगाव : कन्नड घाटात मुलाला मारहाण; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल  | पुढारी

जळगाव : कन्नड घाटात मुलाला मारहाण; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल 

जळगाव, पुढारी ऑनलाईन : सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला असून, त्यामध्ये तरुण-तरुणीला काहीजण मारहाण करीत असल्याचे दिसत आहे. पोलिसांनी मारहाण झालेल्या युवकाचा शोध घेऊन त्याच्या जबाब घेतला आहे. मारहाण करणाऱ्या तरुणांचा  पोलीस शोध घेत आहेत. ही घटना चाळीसगाव तालुक्यातील कन्नड घाटात घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्‍ये तरुणांच्‍या टाेळक्‍याने एका तरुण-तरुणीला  हटकले.  तुम्ही दोघं सोबत का फिरतात? अशी विचारणा करून दाेघांना जबर मारहाण केल्याचा या व्हिडिओमध्ये दिसत आहे. तरुण- तरुणी सोबत फिरत असताना अचानक येऊन टाेळक्‍याने त्‍यांना जंगलात घेऊन जात लाकडी दांडक्याने मारहाण केली.

तरुणाच्या डोक्यात फरशीने मारत त्याचा मोबाईल देखील फोडला आहे. हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करत या गाव गुंडांची परिसरात दहशत माजवण्याची तयारी असल्याची देखील माहिती समोर येत आहे.

मारहाण करणार्‍यांवर कारवाई  करणार : पाेलिस अधीक्षक मुंडे 

याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे यांनी सांगितले की, “हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याची सत्यता पाहण्यासाठी पोलिसांना सूचना केली.  चाळीसगाव येथील कन्नड घाटातील हा व्हिडिओ असल्याचे समोर आले. मारहाण झालेला तरुण हा चाळीसगाव येथील आहे.  त्याला पोलीस ठाण्‍यात बाेलविण्‍यात आले. या घटनेबाबत माहिती देताना त्‍याने सांगितले की,  मी मुलीला चाळीसगाववरून औरंगाबादला जाण्यासाठी लिफ्ट दिली होती. कन्नड  घाटात चार तरुणांनी आम्‍हाला अडवले. तेथून जंगलात नेऊन आम्हाला मारहाण केली. मारहाण करणार्‍या तरुणाचा पाेलिस शाेध घेत आहेत.

Back to top button