सांगली जिल्हा बँकेत पाचशे कोटींचा गैरव्यवहार; मनसे अध्यक्ष सावंत यांचा आरोप

सांगली जिल्हा बँक
सांगली जिल्हा बँक

सांगली; पुढारी वृत्तसेवा : जिल्हा बँकेत गेल्या दोन वर्षांत सुमारे 500 कोटींचा गैरव्यवहार झाला आहे. बँकेच्या लेखापरीक्षणातून ते समोर आाले आहे. याप्रकरणी दोषींवर कारवाई करावी यासाठी रिझर्व्ह बँक, ईडी, सहकार आयुक्त, जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे तक्रार केली आहे. तक्रारीनुसार दोषींवर गुन्हे दाखल केले नाहीत तर न्यायालयात याचिका दाखल करणार आहे, अशी माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजीराव सांवत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सावंत म्हणाले, जिल्हा बँक ही सर्वसामान्य शेतकर्‍यांची आहे. शेतकर्‍यांसाठी ती टिकली पाहिजे. मात्र गेल्या काही वर्षांत कारभारी मंडळी बँकेच्या, शेतकर्‍यांच्या हिताऐवजी स्वत:चे, स्वत:च्या संस्थांचे हित साधत आहेत. गेल्या दोन वर्षांच्या लेखापरीक्षणामध्ये अनेक गंभीर आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. कर्ज वाटपामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्याचे म्हटले आहे. रिझर्व्ह बँक, नाबार्डच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे ताशेरे आहेत.

'स्वप्नपूर्ती' या कागदावर असलेल्या कारखान्यास 23 कोटींचे कर्ज दिले आहे. त्या कर्जाला चार महिन्यांनी तारण देण्यात आले आहे. महांकाली, माणगंगा हे साखर कारखाने विकत घेतल्याचे दाखवले आहे. त्याचे मुद्रांक शुल्कही भरले आहे. मात्र खरेदी
दस्त केलेला नाही. काही साखर कारखान्यांना विनातारण कर्जे दिली आहेत. गोदामामध्ये साखर नसताना ती असल्याचे भासवून कर्ज मंजूर केले आहे.

काही संचालक व अधिकार्‍यांनी संगनमताने घोळ केला आहे. केन अ‍ॅग्रोला दिलेले कर्ज नियमबाह्य आहे. एसजीझेड व एसजीए या एका लोकप्रतिनिधीशी संबंधित कंपन्यांना दिलेले कर्ज वादग्रस्त आहे, असा आरोप सावंत यांनी केला.

दावापूर्व नोटीस

थकबाकीदार 'टॉप 20' संस्थांकडून थकबाकी वसूल करण्यात चालढकल होत आहे. थकबाकीदार संस्था या काही आजी, माजी संचालक, त्यांच्या नातेवाईकांच्या आहेत. बँकेतील गैरव्यवहारप्रकरणी न्यायालयात दावा दाखल करणार आहे. दावापूर्व नोटीसही संबंधित संचालक व अधिकार्‍यांना दिली आहे, असे सावंत यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news