सातारा : प्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्‍साहात साजरा | पुढारी

सातारा : प्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्‍साहात साजरा

प्रतापगड; पुढारी वृत्तसेवा

ओमायक्रॉन संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शिवप्रताप दिन यंदा मोजक्या शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत अगदी साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला. किल्ले प्रतापगडाच्या दैदिप्यमान कामगिरीचा इतिहास सांगणारा शिवप्रताप दिन. प्रत्येक मराठ्याचे रक्त सळसळून निघेल अशी ऐतिहासिक घटना. 10 नोव्हेंबर 1659 रोजी घडली होती. या दिवसाची आठवण म्हणून हा दिवस शिवप्रताप दिन म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी जिल्हा प्रशासनाच्या वतीने शिवप्रताप दिनाचे आयोजन करण्यात येते. या वर्षीदेखील ओमायक्रॉन संसर्गाच्या संकटामुळे अत्यंत साध्या पध्दतीने मोजक्या शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवप्रताप दिन साजरा करण्यात आला.

ओमायक्रॉन संसर्गाच्यआ पार्श्वभूमीवर किल्ले प्रतापगड परिसरात जिल्हा प्रशासनाने १४४ कलम लागू केल्याने या वर्षी किल्ले प्रतापगडावर शिवप्रताप दिन अत्यंत साधेपणाने कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करीत शासनाच्या वतीने पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात आला. जिल्हा पोलीस दलाच्या वतीने सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

अफझलखानाचा वध करून छत्रपती शिवाजी महराजांनी हिंदवी स्वराजाची मुहूर्तमेढ रोवली. या शिवरायांच्या पराक्रमानिमित प्रतिवर्षी किल्ले प्रतापगडावर पूर्वी हा सोहळा प्रतापगड उत्सव समिती व महाराष्ट्रातील विविध भागातील शिवप्रेमी मोठ्या जल्लोषात साजरे करायचे. त्यानंतर गेले १० -१२ वर्षापासून शासनाच्या वतीने तो साजरा केला जातो.

सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास कार्यक्रमास प्रारंभ झाला. अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोराडे तसेच उपवन संरक्षक महादेव मोहिते यांच्या शुभ हस्ते भवानी मातेची पूजा व महाआरती करण्यात आली.यावेळी डी.वाय एस पी.डॉ.शीतल जानवे खराडे, वाईचे उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव,

महाबळेश्वरच्या तहसीलदार सौ. सुषमा चौधरी पाटील, नायब तहसीलदार श्रीकांत तिडके, खंडाळा तहसीलदार दशरथ काळे, महाबळेश्वरचे पोलीस निरीक्षक संदिप भागवात, गटविकास अधिकारी अरुण मरभळ, भवानी मातेचे पारंपारिक सेवेकरी अभय हवालदार भवानी माता मंदिर उपसरपंच सौ जोती जंगम, व्यवस्थापक ओमकार देशपांडे, पुजारी मंगेश बडवे, आनंदा उतेकर, प्रतिक उतेकर, वनसमिती अध्यक्ष विलास मोरे, बबन कासुर्डे, कादर सय्यद तसेच प्रतापगड ग्रामस्थ उपस्थित होते.

भवानी मातेच्या मंदीरासमोर ध्वजस्तंभाचे मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजन करुन शिवशाहीचे प्रतीक असणाऱ्या भगव्या ध्वजाचे रोहण ग्रामपंचायत सरपंच सौ कांचन सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर मानाच्या पालखीची मान्यवरांच्या हस्ते पूजा करण्यात आली.

छत्रपतींची मुर्ती असलेल्या या पालखीची मिरवणूक सुरु झाली. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक यांनी पालखीचे भोई होऊन पालखीचा शुभारंभ केला. त्यानंतर शिवप्रेमी ग्रामस्थांनी जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषात सामाजिक अंतर राखून शिवरायांच्या पुतळ्यापर्यंत पालखी नेली.

पुतळ्या समोरील ध्वजस्तंभावर भगव्याचे ध्वजारोहण जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते झाले. यावेळी सर्व शासकीय अधिकारी, मान्यवर उपस्थित होते. शिवरायांच्या अश्वारूढ शिवपुतळयाचे पूजन व जलाभिषेक मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शिवरायांच्या जयजयकाराच्या घोषणांनी वातावरण भारुन गेले होते.

याचवेळी सातारा पोलीस दलाच्या बॅण्ड पथकाने विविध धून वाजवून मानवंदना दिली. या वर्षी प्रतापगड परिसरात शुकशुकाट दिसत होता. सर्व कार्यक्रम शांततेत व जल्लोषात साजरा झाला. संयुक्त वनव्यवस्थापन समिती प्रतापगड यांच्या वतिने मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

Back to top button