पराभव सहन न झाल्यानेच माझ्याविरोधात षड्यंत्र | पुढारी

पराभव सहन न झाल्यानेच माझ्याविरोधात षड्यंत्र

वाई; पुढारी वृत्तसेवा : पंचायत समिती व काही महिन्यांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत पराभव पत्करावा लागलेल्या प्रवीण जगताप व प्रदीप क्षीरसागर यांनी ग्रामसेवक बाळासाहेब कोचळे याला हाताशी धरून कागदपत्रांची हातचलाखी करून माझे पंचायत समिती सदस्यपद रद्द होण्यासाठीचे षड्यंत्र रचले असल्याचा आरोप माजी उपसभापती अनिल जगताप यांनी पत्रकार परिषदेत केला. दरम्यान, पंचायत समिती सदस्य पद रद्द केल्याच्या निर्णया विरोधात उच्च न्यायलयात दाद मागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

वाई पंचायत समितीचे माजी उपसभापती अनिल जगताप यांनी घरपट्टी न भरल्याने त्यांचे पंचायत समिती सदस्य पद पुणे आयुक्तांनी रद्द केले आहे. या पार्श्वभूमीवर वाई पंचायत समिती येथील आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना जगताप म्हणाले, केंजळ ग्रामपंचायतीची सत्ता प्रवीण जगताप यांच्याकडे असताना ग्रामस्थांना त्रास देण्यापलीकडे त्यांनी काहीही केलेले नाही. किसनवीर कारखान्याचे शेअर्स देतो म्हणून लाखो रुपये गरीब शेतकर्‍यांकडून उकळले आहेत.

त्यात माजी सैनिक निलेश जगताप यांचा समावेश आहे. ग्रामपंचायतीच्या दोन सदस्यांनी आ. मकरंद पाटील यांचे नेतृत्व मान्य करुन राष्ट्रवादीत प्रवेश केला तर त्यांच्याही विरोधात अशाच प्रकारचे षड्यंत्र रचून सदस्य पद रद्द करण्याचा डाव आखला होता. परंतु ग्रामपंचायतीची मुदत संपल्याने ते या बदनामीतून वाचले आहेत. फक्त सुडाचे राजकारण करण्यापलीकडे त्यांनी ग्रामपंचायत सत्ताकाळात गावाचा काहीही विकास केलेला नाही. म्हणून गावाने आ. मकरंद पाटील व माझे नेतृत्व मान्य करुन एकहाती सत्ता राष्ट्रवादीच्या हाती दिली आहे. निवडणुकीत झालेला पराज्य मोठ्या मनाने मान्य करुन गावच्या विकास कामात सहकार्य करायचे सोडून सुडाचे राजकारण करण्यातच ते धन्यता मानत आहेत.

त्यांनी माझ्या विरुध्द निवडणुकीला उभे राहून दाखवावे, पुन्हा जनता कोणाच्या पाठीशी आहे, हे त्यांना नक्कीच समजेल, असे आव्हानही अनिल जगताप यांनी प्रवीण जगताप यांना दिले. ते पुढे म्हणाले, ग्रामसेवक कोचाळे यांची ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढली याचा राग मनात धरुन प्रवीण जगताप यांना चुकीच्या कामात त्यांनी साथ दिली आहे. तसेच भाजपचे स्वयंभू उपजिल्हाध्यक्ष प्रदीप क्षीरसागर यांची अनेक ब्लॅकमेलची प्रकरणे केंजळ गावाला माहीत आहेत. त्यामुळे कोणीही वर्षानुवर्षे राजकारणात असणार्‍या अनिल जगताप यांच्यावर चिखलफेक करु नये, गावाची बदनामी होवू नये म्हणूनच आम्ही शांत आहोत, असा इशारा देत उपसरपंच अमोल कदम, निलेश जगताप, कुमार जगताप यांनी केंजळ ग्रामपंचायतीच्या दहा वर्षातील कारभाराची चौकशी लावणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचलत का?

Back to top button