सातारा जिल्ह्यात वाढणार जिल्हा परिषदेचे 10 गट? | पुढारी

सातारा जिल्ह्यात वाढणार जिल्हा परिषदेचे 10 गट?

सातारा; पुढारी वृत्तसेवा : राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाने वाढीव लोकसंख्येच्या निकषांनुसार जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचे गट आणि पंचायत समित्यांच्या गणांची पुन्हा नव्याने प्रारूप रचना केली जाणार आहे. त्यानुसार जिल्ह्यात तब्बल 10 गट व 20 गण वाढणार आहेत. जिल्ह्यात सध्या 64 गट व 128 गण आहेत. नवीन रचनेनुसार 74 गट व 148 गण निर्माण होऊ शकतात. त्यामुळे वाढणार्‍या या नव्या गट आणि गणात कोणत्या गावांचा समावेश होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या गट आणि गणांची प्रारूप प्रभाग रचना कालबाह्य झाली आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाने वाढलेली लोकसंख्या विचारात घेऊन जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या सदस्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या प्रमाणात सदस्य संख्या वाढणार आहे. त्या प्रमाणात गट आणि गणांची संख्याही वाढणार आहे. काही दिवसांपूर्वी गट आणि गणांची फेररचना करण्यात आली होती. मात्र, मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर राज्य निवडणूक आयोगाने लोकसंख्या वाढीच्या निकषांनुसार पुन्हा नव्याने प्रारूप रचना तयार करण्याचे आदेश दिले आहेत.

सातारा जिल्ह्यातील खटाव, माण, फलटण, कराड या तालुक्यांमध्ये गट आणि गणांची संख्या वाढण्याची शक्यता अधिक आहे. सदस्यांची संख्या वाढणार असल्याने आता पुन्हा नव्याने गटांची रचना आणि आरक्षण जाहीर होणार आहे. निवडणूक आयोगाने सध्याची संख्या लक्षात घेऊन गण आणि गणांची सीमारेषा ठरवण्याचा आदेश दिला होता. हे काम अंतिम टप्प्यात असतानाच सरकारने सदस्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला. ही संख्या वाढविण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 मधील कलम 9 (1) मध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. नगरपालिकेनंतर आता जिल्हा परिषदेतही सदस्यांची संख्या वाढल्याने सर्वच राजकीय पक्षांमधील इच्छुकांमध्ये चढाओढ लागली आहे.

गेल्या पाच वर्षात जिल्ह्यातील सध्याच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांबरोबर नवीन इच्छुकांनी आपापल्या गट आणि गणात वर्चस्व राखण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले आहेत. गट आणि गणात समाविष्ट असणारी गावे आणि वाड्यावस्त्यांवर विकासकामांबरोबर चांगला संपर्कही ठेवला आहे. मात्र आता नव्याने प्रारुप रचना होणार आहे. गावांची अदलाबदल होणार आहे. नवीन गट आणि गणात कमी कालावधीत नव्याने मशागत करावी लागणार आहे. कोणत्या गटात आणि गणात कोणती गावे, वाड्या वस्त्या समाविष्ट होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आता गट व गणातील मतदारसंख्या कमी होणार

जिल्हा परिषद, पंचायत समितींच्या गेल्या निवडणुकीत एका गटात सरासरी 40 ते 45 हजार तर एका गणात 20 ते 22 हजार मतदारांचा समावेश होता. आता गट आणि गणांची संख्या वाढणार असल्याने जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी एका गटात 30 ते 35 हजार तर गणात 15 ते 17 हजार मतदारांचा समावेश होणार आहे. या बदलामुळे प्रचार यंत्रणा राबवणे काही अंशी सोपे होणार आहे.

Back to top button