बाळासाहेब ठाकरेंच्‍या 'त्‍या' निर्णयामुळे सेनेत झाले हाेते पहिले बंड | पुढारी

बाळासाहेब ठाकरेंच्‍या 'त्‍या' निर्णयामुळे सेनेत झाले हाेते पहिले बंड

पुढारी ऑनलाईन डेस्‍क

शिवसेनेतील दिग्‍गज नेते अशी ९०च्‍या दशकात मनोहर जोशी यांची ओळख हाेती. १९९५ मध्‍ये शिवसेना-भाजप युती पहिल्‍यांदा सत्तेत आली आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मनाेहर जाेशी यांना मुख्‍यमंत्रीपद दिले; पण एकदा मनोहर जोशींंमुळे छगन भुजबळ हे बाळासाहेब ठाकरे यांच्‍यावर नाराज झाले होते.

बाळासाहेब ठाकरे यांच्या निकटवर्तीयांपैकी एक असणारे छगन भुजबळ हे शिवसेनेतील दिग्‍गज नेते हाेते. ओबीसी समाजावर त्यांची  पकड हाेती. शिवसेना ग्रामीण भागात रुजण्‍यास भुजबळ यांनी प्रयत्‍न केले. १९९० मध्ये अशी एक घटना घडली की, यामुळे  छगन भुजबळ हे बाळासाहेब ठाकरे यांच्यावर नाराज झाले. काही वर्षांमध्‍ये ही नाराजी एवढी वाढली की, भुजबळ  शिवसेनेतून बाहेर पडले.

वर्ष १९९०

१९९० हे वर्ष हाेतं. राज्यात विधानसभेच्या निवडणूका झाल्या. निकाल लागला. शिवसेना मोठा पक्ष म्हणून उदयास आला.  विरोधी पक्षनेता कोण होणार ?  या प्रश्‍नाचे उत्तर शिवसेना ठरविणार हाेते. स्‍पर्धेत दाेन नावं हाेती. पहिलं छगन भुजबळ तर दुसरे मनाेहर जाेशी. दोघेही हे पद मिळावे म्‍हणून आग्रही हाेते.

बाळासाहेब ठाकरे  आपल्‍यालाच  विरोधी पक्षनेता पद देणार, असे छगन भुजबळ यांनी गृहीत धरले हाेते; पण विरोधी पक्षनेतेपदाची माळ बाळासाहेब ठाकरेंनी मनोहर जोशी यांच्या गळ्यात टाकली. या निर्णयामुळे छगन भुजबळ हे बाळासाहेब ठाकरे यांच्‍यावर नाराज झाले. भुजबळांना विरोधी पक्षनेतेपदापासून दूर ठेवले इतकेच नाही तर त्यांना पुन्हा एकदा बीएमसीच्या राजकारणात पाठवून मुंबईचे महापौर केलं.  भुजबळ पुन्हा राज्याच्या राजकारणातून शहराच्या राजकारणाकडे वळले.

छगन भुजबळांनी राज्यात काम केलं असल्यामुळे त्यांना मुंबईतल्या राजकारणात काही रस नव्हता. त्यांची घुसमट व्हायला लागली. याच काळात केंद्रात राष्ट्रीय आघाडीचे सरकार सत्तेवर आलं. त्यावेळी व्ही.पी. सिंह पंतप्रधान झाले होते. या सरकारने मागासवर्गीय आरक्षणाबाबत मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्रातील शिवसेनेचा भागीदार असलेला पक्ष भाजप या निर्णयाला पाठिंबा देत होता, मात्र शिवसेनेचा विरोध होता. ओबीसी समाजातून आलेल्या छगन भुजबळांना ही गोष्ट खटकली.

तत्कालीन पंतप्रधान व्ही.पी. सिंह यांनी मुंबईला भेट देऊन भुजबळांना जनता दलात येण्याचे निमंत्रण दिले होते. यावेळी त्‍यांनी शिवसेना सोडली नाही; पण नाराजी व्यक्त केली हाेती. याचं उदाहरण म्हणजे, लालकृष्ण अडवाणी यांनी काढलेल्‍या  रथयात्रेच्‍या स्वागतसाठी बैठक होती. भाजप आणि सेनेची ही संयुक्त बैठक होती. या बैठकीला भुजबळ यांनी दांडी मारली. आणि उघड उघड नाराजी व्यक्त केली. मात्र भुजबळांनी आपली मूक नाराजी फार काळ ठेवली नाही.

भुजबळ यांनी मनोहर जोशी यांच्यावर जाहीर टीका करण्यास सुरुवात केली होती. विरोधी पक्षनेते म्हणून ते अपयशी असल्याचे सांगितले. पुन्हा मुंबईचे महापौर होण्यात आपल्याला स्वारस्य नसून आता आपल्याला विरोधी पक्षनेते करावे, असे त्यांनी स्पष्ट केलं. भुजबळांचा  बंडखाेरीचा सूर पाहून बाळासाहेब ठाकरेंनी मनोहर जोशी आणि छगन भुजबळ या दोघांना मातोश्रीवर बोलावून समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला. भुजबळांनी टीका करायची थांबवली. पण ते  फार काळ शांत बसले नाहीत.

 ५ डिसेंबर १९९१

अखेर छगन भुजबळांनी बाळासाहेब ठाकरें विरोधात बंडाचे बिगुल वाजवले. भुजबळ यांच्या नेतृत्वात सेनेच्या १८ आमदारांनी शिवसेना-ब नावाचा वेगळा गट स्थापन केला. शिवसेनेतून बाहेर पडत असल्याचे पत्र त्यांनी सभापतींना दिलं. या पत्राला सभापतींनी मान्यता दिली. यानंतर भुजबळांनी काँग्रेसचे सदस्यत्व स्वीकारले. शिवसेनेच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच बाळासाहेब ठाकरेंविरोधात एका नेत्‍याने बंडाचा झेंडा फडकविण्‍याचे धाडस केलं होते.

भुजबळांनी शिवसेनेला दुखावले; पण याचवेळी मित्रपक्ष असलेल्या भाजपनेही सेनेला दुखवलं. भुजबळांच्या बंडानंतर विधानसभेतील शिवसेनेच्या आमदारांचे संख्याबळ ५२ वरून ३४  झालं. संख्‍याबळाचा विचार करुन भाजपचे ४२ आमदार हाेते. त्‍यामुळे भाजपने   विरोधी पक्षनेतेपदाची मागणी केली. भाजपच्या मागणी शिवसेनेला मान्‍य करावे लागली. आणि गोपीनाथ मुंडे भाजपचे विरोधी पक्षनेते झाले. एकुणच बाळासाहेब ठाकरे यांनी मनाेहर जाेशी यांची विराेधी पक्ष नेतेपदी केलेली निवड हे सेनेतील पहिल्‍या बंडखाेरीला कारणीभूत ठरले.

हेही वाचलंत का?

Back to top button