पुणे : भाजपमधील ‘त्या’ राजीनामा नाट्यावर अखेर पडदा | पुढारी

पुणे : भाजपमधील ‘त्या’ राजीनामा नाट्यावर अखेर पडदा

पुणे : पुढारी वृत्तसेवा

सत्ताधारी भाजप च्या नगरसेविका आणि तिच्या पतीने दिलेल्या राजीनामा नाट्यावर अखेर पडदा पडला आहे. भाजप चे प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांनी संबंधित नगरसेविका आणि स्थानिक आमदार यांची बुधवारी एकत्रित बैठक घेऊन हा वाद मिटविल्याचे सांगितले.

पक्षातील आमदार आणि पदाधिकारी यांच्या तक्रारी आणि दबावाला वैतागून भाजपच्या एका नागरसेविकेने तिच्या पदाचा आणि पतीने पक्ष संघटनेचा राजीनामा दिला होता. यासंबधीचे वृत्त दै. पुढारीने प्रकाशित केल्यानंतर चांगलीच खळबळ उडाली होती.

या प्रकाराची तातडीने दखल घेत प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी बुधवारी संबधीत नगरसेविका, आमदार आणि पक्ष संघटनेतील काही प्रमुख पदाधिकारी यांची एकत्रित बैठक घेतली. या बैठकीत नगरसेविकेने त्यांची बाजू मांडली, तसेच आमदारांची भूमिका जाणून घेतली. त्यानंतर दोन्ही बाजू ऐकून घेऊन प्रदेशाध्यक्षांनी या दोघांनाही समाजावून सांगत या विषयावर पडदा टाकला. त्यामुळे संबंधित नगरसेविका आणि तिच्या पतीचा राजीनामा हा पेल्यातील वादळ ठरले.

दरम्यान आमची व्यथा आम्ही आमच्या नेत्यांकडे मांडली होती, त्यांनी ती समजावून घेतली आणि संबंधितांना सूचनाही केल्या, त्यामुळे आमची नाराजी दूर झाली असल्याचे संबधित नगरसेविकडून सांगण्यात आले.

Back to top button