चंद्रकांत पाटील : विधान परिषद बिनविरोधचा प्रस्ताव नाही | पुढारी

चंद्रकांत पाटील : विधान परिषद बिनविरोधचा प्रस्ताव नाही

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : राज्यात विधान परिषदेच्या सहा जागांसाठी होणार्‍या निवडणुकांत पाच जागांवर भाजप निवडून येण्याची दाट शक्यता आहे. या निवडणुका बिनविरोध करण्याबाबत महाविकास आघाडीकडून कोणताही प्रस्ताव आलेला नाही. मात्र, योग्य प्रस्ताव आल्यास भाजप विचार करू शकतो, बिनविरोधाचा भाजप पहिला प्रस्ताव देणार नाही, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

काँग्रेसच्या डॉ. प्रज्ञा सातव यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर राज्यातील सर्वच जागा बिनविरोध होणार असल्याची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आ. पाटील म्हणाले, अशाप्रकारची कोणतीही हालचाल अथवा प्रस्ताव नाही. तसा योग्य प्रस्ताव आलाच, तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करूनच निर्णय होईल. मुंबईत दोनपैकी एकच जागा निवडून येण्याची शक्यता असल्याने एकाच जागेवर भाजपने अर्ज दाखल केला आहे. अनावश्यक चुरस निर्माण करणे, हा भाजपचा स्वभाव नाही. राज्यातील इतर जागांबाबत भाजपची निवडून येण्याची क्षमता असल्याने वेगळी स्थिती आहे.

सहापैकी पाच जागा जिंकण्याची शक्यता असताना भाजप स्वत:हून बिनविरोधाचा प्रस्ताव देणार नाही. छाननीनंतर ही चर्चा सुरू होईल. 26 नोव्हेंबरपर्यंत संधी आहे. जो काही निर्णय घ्यायचा तो लवकर घ्यावा लागेल, असेही आ. पाटील यांनी स्पष्ट केले.

‘लांडगा आला रे आला’ होईल

चंद्रकांत पाटील यांनी नव्या वर्षात महाविकास आघाडी सरकार पडेल, असे म्हटल्यावर पाटील यांनी आतापर्यंत दोन वर्षांत 28 वेळा सरकार पाडण्याचा मुहूर्त काढल्याची टीका संजय राऊत यांनी केली. त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘लांडगा आला रे आला’ या गोष्टीसारखे होईल, काहीच होणार नाही म्हणून ते गप्प झोपतील आणि कधी हे घडून गेले हे त्यांना कळणारच नाही.

कोल्हापुरात तुल्यबळ लढत : चंद्रकांत पाटील

कोल्हापूर विधान परिषद निवडणुकीत भाजप आघाडीला विजयासाठी 43 मतांची गरज आहे. तर, काँग्रेस आघाडीला 90 मतांची जोडणी करावी लागणार आहे. भाजपच्या विजयासाठी करावे लागणारे सर्व प्रयत्न केले आहेत, त्यामुळे कसलीही अडचण नाही. कोल्हापुरात तुल्यबळ लढत होईल, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला.

आ. चंद्रकांत पाटील म्हणाले, नागपूर विधान परिषदेसाठी निवडणुकीत भाजप 90 मतांनी पुढे आहे. धुळे येथे भाजपच्या बाजूने वन-वे निवडणूक आहे. मुंबईमध्ये समसमान होईल. अकोल्यात तीन वेळा आमदार असलेल्या शिवसेनेशी लढत होत असल्याने टफ फाईट आहे. मात्र, कोल्हापुरातील चित्र वेगळे आहे.

कोल्हापुरात विजयासाठी 208 पेक्षा अधिक मते लागतील. भाजप, जनसुराज्य, आवाडे गट आदी मित्र पक्षांची मिळून भाजपकडे 165 मते आहेत. विजयासाठी फक्त 43 च मते लागतील. याउलट काँग्रेस आघाडीकडे 118 मते आहेत. जिंकण्यासाठी आम्हाला फक्त 43 मतांची गरज आहे. तर, त्यांना 90 मतांची जोडणी करावी लागणार आहे. त्यामुळे राज्यातील इतर निवडणुकांच्या तुलनेत ही निवडणूक तुल्यबळ आहे, असेही आ. पाटील म्हणाले.

Back to top button