सांगली : प्रतिकूल पाडले; अनुकूल आणले | पुढारी

सांगली : प्रतिकूल पाडले; अनुकूल आणले

“सांगली : पुढारी वृत्तसेवा” image=”http://”][/author]

जिल्हा सहकारी बँकेचे निकाल पाहता राष्ट्रवादी चे प्रदेशाध्यक्ष व पालकमंत्री जयंत पाटील यांनी पक्षीय राजकारणाच्या बेरजेपेक्षाही स्वत:चे नेतृत्व प्रस्थापित करण्यात यश मिळविले आहे. जयंतरावांनी प्रतिकूल ठरणार्‍यांना पाडले, तर अनुकूल ठरणार्‍यांना निवडून आणले आहे. राजकीय वर्तुळात त्याची चर्चा जोरात आहे. काँग्रेसची ताकद मर्यादित ठेवण्यातही जयंत पाटील यांना यश आले आहे. जिल्हा बँक निवडणुकीत जयंतरावांची खेळी यशस्वी झाली आहे.

काँग्रेसचे युवा नेते सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम हे काँग्रेसवरील आणि जिल्ह्यावरील प्रभूत्व वाढविण्यासाठी प्रयत्नपूर्वक पावले टाकत आहेत. काँग्रेस जिल्हाध्यक्ष निवडीत त्यांनी पक्षात वरिष्ठस्तरावर असलेली ताकद दाखवून दिली. महानगरपालिका क्षेत्रातही पक्षाची तसेच स्वत:च्या गटाची ताकद वाढविण्यावर भर दिला. अशा परिस्थितीत जिल्हा बँक निवडणुकीत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व डॉ. कदम यांचे जवळचे नातेवाईक आमदार विक्रम सावंत यांचा झालेला पराभव हा डॉ. कदम यांच्या वाटचालीला शह देणारा ठरला आहे.

जतेत भाजप-राष्ट्रवादी
मैत्रीवर शिक्कामोर्तब
जिल्हा बँक निवडणुकीत ‘काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना’ या तीन पक्षांची महाविकास आघाडी झाली. जत तालुक्यात मात्र राष्ट्रवादी आणि भाजपने एकत्र येत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सावंत यांचा पराभव केला. जयंतरावांनी जत तालुक्यातील राष्ट्रवादीला या निवडणुकीत भाजपसोबत हातमिळवणी करण्यास मोकळीक दिली, तेव्हाच काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता पसरली होती

. पराभवाची छाया पसरली होती. मात्र काँग्रेसने उसने अवसान गोळा करून निवडणुकीत विजयाचा दावा केला, पण अखेर सावंत यांचा पराभव झाला. भाजपमधून नुकतेच राष्ट्रवादीत गेलेल्या व जिल्हा बँक निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची ‘परवानगी’ घेऊन भाजपकडून ऐनवेळी उमेदवारी घेऊन लढलेल्या प्रकाश जमदाडे यांचा विजय झाला आहे. राष्ट्रवादीने जमदाडे यांना उघड मदत केली.

भाजपनेही काँग्रेसचा पराभव करायचा, हा चंग बांधून राष्ट्रवादीकडून उमेदवार घेत ताकद दिली. इतर मागासवर्गीय गटातून जत तालुक्यातून राष्ट्रवादीचे उमेदवार मन्सूर खतीब निवडून आले आहेत. तालुक्यात राष्ट्रवादीने दोन उमेदवार निवडून आणून काँग्रेसपुढे आव्हान उभे केले आहे. आमदार सावंत यांना शह म्हणजे राज्यमंत्री डॉ. कदम यांना शह मानला जात आहे.

इस्लामपूर विधानसभेसाठी बेरीज
जयंत पाटील यांनी माजी आमदार विलासराव शिंदे यांचे चिरंजीव वैभव शिंदे यांना भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश करायला लावून जिल्हा बँकेत प्रचंड मताधिक्क्याने निवडून आणले आहे. जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील हेही नाराज होणार नाहीत, याची दक्षता जयंत पाटील यांनी घेतली आहे. एकूणच त्यांनी इस्लामपूर विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा बँक निवडणुकीच्या माध्यमातून बेरीज केली आहे.

खासदार पाटील यांनी अंग काढले
भाजपचे खासदार संजय पाटील यांची राष्ट्रवादीशी असलेली जवळीक लपून राहिलेली नाही. खासदार पाटील यांनी या निवडणुकीतील आपले उमेदवारी अर्ज माघार घेत भाजपला पहिला दणका दिला होता. निवडणुकीतून त्यांनी अंग काढून घेतले होते. तासगाव तालुका विकास सोसायटी मतदारसंघात भाजप उमेदवाराला 23 मते तर अपक्ष उमेदवाराला 15 मते पडली. महाविकास आघाडीला 41 मते पडली. मतांची विभागणी राष्ट्रवादी उमेदवाराच्या पथ्यावर पडली आहे.

सत्यजित देशमुख यांना मदत
शिराळा तालुका विकास सोसायटी मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आमदार मानसिंगराव नाईक बिनविरोध निवडून आलेले आहेत. बिनविरोधसाठी त्यांना भाजपची साथ लाभली. त्याची परतफेड म्हणून भाजपचे उमेदवार सत्यजित देशमुख यांना राष्ट्रवादीची काही कुमक मिळाली असणार, हे निश्चित. मतमोजणीनंतर ते दिसून आले. भाजपचे विजयी उमेदवार सत्यजित देशमुख यांना 274 मते, तर भाजपचे दुसरे विजयी उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांना 261 मते मिळाली. मजूर सहकारी सोसायटीच्या ‘संग्राम’मध्ये ‘देशमुख’ यांचे वर्चस्व सिद्ध झाले आहे.

आटपाडी तालुका विकास सोसायटी मतदारसंघातून भाजपचे उमेदवार माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांचा पराभव धक्कादायक आहे. आटपाडी तालुक्यात शिवसेनेचे नेते तानाजी पाटील यांनी वर्चस्व सिद्ध केले आहेे. त्यांची पुढील राजकीय वाटचाल लक्षवेधी ठरणार आहे.
राष्ट्रवादी, भाजपशी संधान
कवठेमहांकाळ तालुका विकास सोसायटी मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार अजितराव घोरपडे यांनी एकतर्फी विजय मिळविला आहे. याठिकाणी घोरपडे यांनी राष्ट्रवादी, भाजपशी संधान साधून मोठा विजय मिळविला आहे.

 

1 विश्वजित कदम; विशाल पाटील यांना शह

जत तालुका विकास सोसायटी मतदारसंघातून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार विक्रम सावंत यांचा सनसनाटी पराभव हा राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांना शह मानला जात आहे. महिला आरक्षित मतदारसंघातून जयश्रीताई मदनभाऊ पाटील यांचा मोठा विजय हा काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांना शह मानला जात आहे. जयश्रीताई यांना ताकद देऊन विशाल पाटील यांना सांगलीच्या राजकारणात पक्षातच गुंतवून ठेवण्यात जयंत पाटील यशस्वी झाले असल्याची चर्चा जोरात आहे. अर्थात या सर्वातून त्यांनी काँग्रेसला शह दिला आहे.

2 जयश्रीताईंच्या विजयाने मदनभाऊ गट रिचार्ज

जिल्हा बँकेच्या गेल्या निवडणुकीत मिरज तालुका विकास सोसायटी मतदारसंघातून मदनभाऊ पाटील यांचा विशाल पाटील यांच्याकडून पराभव झाला होता. या पराभवाची सल मदनभाऊ गटामध्ये होती. यावेळी महिला आरक्षित मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार जयश्रीताई पाटील यांनी मोठा विजय मिळविला. त्यामुळे मदनभाऊ गट रिचार्ज झाला आहे. या निवडणुकीत मदनभाऊ गटाच्या कार्यकर्त्यांनी कोणतीही रिस्क न घेता सर्व तालुके पिंजून काढले. स्थानिक नेत्यांना भेटले. मदनभाऊंचे व तालुका नेत्यांचे ऋणानुबंध जयश्रीताईंच्या मोठ्या विजयासाठी कारणीभूत ठरले.

3 शिवसेनेचे प्रथमच तीन संचालक

जिल्हा बँक निवडणुकीत प्रथमच शिवसेनेेचे तीन संचालक निवडून आले आहेत. आमदार अनिलराव बाबर बिनविरोध निवडून आले. तर तानाजी पाटील व अजितराव घोरपडे यांचा विजयही लक्षवेधी ठरला आहे

 

Back to top button